Head linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

खातेवाटपाचा ‘अर्थ’ जुळेना, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटेना!

– अजित पवार तातडीने अमित शाहांच्या भेटीला;  शिंदे गटाकडून अर्थखाते अजितदादांना देण्यास विरोध!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने विरोध केल्याने राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून, गेली तीन दिवस ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकांवर बैठकांचे सत्र पार पडूनही तिढा न सुटल्याने काल अखेर अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली गाठत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत पवार व शाह यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, रात्री उशीरा हाती आलेल्या माहितीनुसार, आज किंवा उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, खाते वाटपालाही नवी दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे.

याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले, की आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न मार्गी लागेल. सद्या आमच्यात व्यवस्थित चर्चा सुरू आहे. दरम्यान,  आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तीनही पक्षाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार असून, त्यानंतर शक्य झाले तर लगेचच ११ वाजता दहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडू शकतो. तूर्त तरी मंत्रिमंडळ विस्तारासाठी ४-४-२ असा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचे सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे आज किंवा उदया भाजप, शिंदे गटाचे प्रत्येकी चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री शपथ घेऊ शकतात. शिंदे गटाकडून भरतसेठ गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम ही तीन नावे निश्चित असून, चौथे नाव डॉ. संजय रायमुलकर किंवा संजय सिरसाठ या दोन दलित नेत्यांपैकी एकाचे निश्चित होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गट तीन महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसला आहे. तर महत्त्वाची खाती सोडण्यास शिंदे गटाने नकार दिला आहे. अर्थ, जलसंपदा, ग्रामविकास खात्यावरुन तिढा सुरू आहे. शिंदेंच्या आमदारांनी बंडावेळी अजित पवारांवर निधी देत नसल्याचे आरोप केले होते. त्यामुळे अजित पवारांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा तीव्र विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून या तीनही नेत्यांमध्ये रात्री उशिरा बैठका पार पडल्या आहेत. पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. दरम्यान, रात्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील या बैठकीला हजर होते, अशी माहिती मिळाली आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!