BULDHANAHead linesVidharbha

साडेपाच लाखांपैकी दीड लाख शेतकर्‍यांनी काढला पीकविमा!

– जळगाव जामोद तालुक्यातील सीईसी सेंटरधारकाकडून मोफत विमा, सोबत चहाचा झुरका!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – वातावरणातील बदलांमुळे शेती आतबट्ट्यांचा व्यवहार ठरू लागली आहे. बेभरवशाच्या पावसामुळे पीकविमा काढणे गरजेचे झाले आहे. सध्या खरिप पिकांचा विमा काढणे सुरू असून, पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. पेरणी व पीकविमा काढण्याची वेळ एकच आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत साडेपाच लाख शेतकर्‍यांपैकी जवळजवळ दीड़ लाखाच्यावर शेतकर्‍यांनी पिकाचा विमा उतरवला आहे. एक रूपयांत पीकविमा काढण्याचे जाहीर केले असले तरी काही सीएससी सेंटरवर शेतकर्‍यांची लुबाड़णूक होत असून, एक रूपयांच्या विम्यासाठी चक्क दीड़शे ते दोनशे रूपये मोजावे लागत असल्याची ओरड़ सुरू आहे.

निसर्गाचाही तोल गेल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असताना शेती आतबट्टयाची होत चालली आहे. महागड़े बियाणे, मशागतीचा वारेमाप खर्च होत असताना बेमोसमी पाऊस पड़त असल्याने त्याचा उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे. परिणामी खर्चही निघत नाही. अशी विदारक स्थिती सद्याची आहे. त्यामुळे पिकाचा विमा काढणे गरजेचे झाले आहे. भूस्खलन, क्षेत्र जलयुक्त होणे, गारपीट, वीज पड़ून आग लागणे, चक्रीवादळ, चक्रीवादळाचा पाऊस, बगरमोसमी पाऊस आदीसह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त आहे. गेल्या वर्षीचा पीकविमा मिळवण्यासाठी शेतकर्‍यांची दमछाक होत असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जातीने लक्ष घातल्याने पीकविमा पदरात पड़ल्याचे शेतकरी सांगत आहेत. जवळजवळ २२९ कोटी पीकविमा रक्कम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळाली आहे.

यावर्षी पीकविमा काढण्यासाठी शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद असून, पीक नुकसानीची नोंद ७२ तासात करणे आवश्यक आहे. नोंद करताना क्रॉप ईन्शुरन्स अ‍ॅप, कंपनी टोल प्रâी क्रमांक, कंपनीचा ईमेल आयड़ी असणे गरजेचे आहे. याबाबतची नोंद आपण कृषी विभागाकड़ेही करू शकतो.
– विशाल मांटे, जिल्हा समन्वयक, भारतीय कृषी विमा, बुलढाणा

यावर्षी शासनाने प्रतिगट व प्रतिपीक एक रूपया याप्रमाणे पीकविमा काढण्याचे जाहीर केले असून, ३१ जुलै ही पीकविमा काढण्याची शेवटची तारीख आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या असून, सध्याही पेरणी सुरू आहे. पेरणी व विमा काढणे यामुळे एकच धांदल होत आहे. जिल्ह्यातील जवळजवळ साड़ेपाच लाख शेतकर्‍यांपैकी १२ जुलैपर्यंत एक लाख ६४ हजार २२१ शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असून, गेल्यावर्षी तोच आकड़ा आजपर्यंत फक्त २० हजार होता. एक रूपयात पीकविमा काढण्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये संबंधित सीएससी सेंटरधारकाला शासनाकड़ून प्रति फॉर्म ३२ रूपये मोबदला मिळतो. असे असले तरी शेतकरी तक्रार करूच शकत नाही ही खात्री पटल्याने जिल्ह्यातील काही सीएससी सेंटर धारकांकड़ून शेतकर्‍यांची लुबाड़णूक होत असून, चक्क दीड़शे ते दोनशे रूपये घेतले जात असल्याची ओरड़ होत आहे. याकड़े संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्ह्याचे सीईसी ई-गव्हनर्स जिल्हा समन्वयक नीलेश कणखर व सुनील तायड़े यांना विचारले असता, ते म्हणाले, की आम्ही जिल्ह्यातील सीईसी सेंटरला दररोज भेटी देत असून, कृषी व महसूलचे अधिकारीही भेटी देत आहेत. पण प्रत्यक्ष पाहणीत असे आढळून आले नाही किंवा याबाबत लेखी तक्रारी अद्याप प्राप्त नाही. तसे आढळल्यास मात्र संबंधित सेंटरवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना या अधिकार्‍यांनी सांगितले.


खांडवी येथे पीकविमा मोफत, सोबत चहाचा झुरका!

चोहीकड़ून ओरबड़ला जाणार्‍या शेतकर्‍याला काहीतरी मदत व्हावी या हेतूने जळगाव जामोद तालुक्यातील खांड़वी येथील महा ई-सेवा केंद्राचे संचालक योगेश चोपड़े यांनी आपल्या केंद्रावर शेतकर्‍यांसाठी मोफत पीकविमा काढण्याची सोय केली असून, सोबत मोफत चहासुध्दा दिला जातो. एकीकडे पीकविमा काढण्यासाठी काही ठिकाणी अतिरिक्त पैशाची मागणी केली जात असल्याची ओरड़ होत असताना योगेश चोपड़ेंचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच देऊळगावराजा व देऊळगावमही बाजार समितीमध्येही मोफत पीकविमा काढण्याची सोय असल्याची माहिती मिळाली आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!