Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

‘खासदार’कीसाठी रविकांत तुपकरांना सर्वाधिक पसंती!

– काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यापेक्षा भाजपच्या श्वेताताई महाले यांना जास्त मते!

बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे/प्राची कुलकर्णी) – बुलढाणा लोकसभेच्या निवडणुका अवघ्या आठ महिन्यांवर आल्या असताना, ‘स्ट्रॉपोल’ या खासगी सर्वेक्षण संस्थेने व्हॉटसअपच्या माध्यमातून सॅम्पल सर्वेक्षण केले असता, या सर्वेक्षणाचे अत्यंत धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. विशेष बाब म्हणजे, या सर्वेक्षणावर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची टीम बारकाईने लक्ष ठेवून होती. तब्बल 43.99 टक्के जिल्हावासीयांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खासदार व्हावे, असा कौल दिला असून, शिवसेना (ठाकरे) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांना द्वितीय क्रमांकाची म्हणजे 37.87 टक्के इतकी पसंती मिळाली आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना फक्त 7.41 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. हे सर्वेक्षण व्हॉटसअपच्या माध्यमातून झाले असून, ‘शितावरून भाताची परीक्षा’ या तत्वाचा हा निकाल म्हणावा लागेल. अजूनही हे सर्वेक्षण सुरू आहे. (https://strawpoll.com/xVg7jNJKpnr/results)

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हावासीयांकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे संकेत देणारा निष्कर्ष स्ट्रॉपोलच्या सर्वेक्षणातून बाहेर आला आहे. सॅम्पल सर्वेक्षणात विविध व्हॉटसअप ग्रूपवरील 9 हजार 163 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 43.99 टक्के म्हणजे 4 हजार 031 लोकांनी रविकांत तुपकर यांच्या बाजूने; 37.87  टक्के म्हणजे 3 हजार 470 लोकांनी प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या बाजूने; 679  म्हणजे 7.41 टक्के लोकांनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या बाजूने; चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या बाजूने 333 (3.63 टक्के); सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बाजूने 325 (3.55 टक्के) तर सर्वात कमी पसंती ही बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना अवघी 3.55 टक्के म्हणजे 325 इतकी मिळाली आहे. त्यामुळे खासदारकीची तयारी करणार्‍या बंटीदादांना हा निष्कर्ष धक्कादायक असा आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सद्या संमिश्र असे राजकीय चित्र निर्माण झालेले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासोबत युतीत असलेल्या काँग्रेसने बुलढाण्याची जागा परत मागण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येथून माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ किंवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई शेळके हे इच्छुक आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने तेदेखील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून खासदारकीसाठी मैदानात उतरणार आहेत. तर बुलढाण्याची जागा मागीलवेळी शिवसेनेकडे होती. आताही विद्यमान खासदार हा शिवसेनेचाच आहे. हा जिल्हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेनेकडे राखण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून आतापासून दबाव निर्माण केला जात आहे. तर या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीचेही दोन गट निर्माण झालेले आहेत. तथापि, अजितदादांचा गट आपला उमेदवार लोकसभेसाठी देण्याची शक्यता नाही. उलट ते भाजपच्या उमेदवाराला आपला पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे. दुसरीकडे, बुलढाण्याची जागा भाजपने लढविण्याची तयारी सुरू झालेली असून, भाजपच्या वरिष्ठांनी तशी उघड विधाने यापूर्वी केलेली आहेत. त्यामुळे खा. प्रतापराव जाधव हेच कमळ चिन्हावर लढतील, किंवा भाजप येथे आ. श्वेताताई महाले पाटील यांनाही उमेदवारी देऊ शकतो. तथापि, याबाबत अद्याप शिंदे सेना किंवा भाजप यांनी आपले पत्ते उघड केलेले नाही. भाजपने मात्र मतदारसंघ बांधण्यास सुरूवात केली आहे.

https://strawpoll.com/xVg7jNJKpnr/results


विविध शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले शेतकरी नेतृत्व म्हणून रविकांत तुपकर यांची जिल्ह्यात सद्या लोकप्रियता वाढली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पोहोचलेली आहे. त्यामुळे ‘इलेक्टिव मेरीट’ पाहाता, बुलढाण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेऊन रविकांत तुपकर यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी बाध्य करण्याची रणनीती शरद पवार यांच्या पातळीवर यापूर्वीच निश्चित झालेली आहे. तसेच, तुपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्य तितक्या लवकर प्रवेश करावा, असे निरोपही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु, रविकांत तुपकर यांचे शिवसेना (ठाकरे) व भाजप (देवेंद्र फडणवीस) यांच्याशीही बोलणे सुरू असल्याने तुपकर हे आपल्यावर पक्षाचा शिक्का लावून घेण्यास सद्या तरी टाळाटाळ करत आहेत. आता ‘स्ट्रॉपोल’च्या सर्वेक्षण निष्कार्षाने तुपकरांचा आत्मविश्वास वाढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी त्यांच्यावर आणखी दबाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर हे निवडून आले तर शेतकर्‍यांचा एक लढवय्या व तरूण नेता लोकसभेत पोहोचणार आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!