Head linesKhandeshPachhim MaharashtraVidharbha

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून ४०० फूट खोल दरीत कोसळली; महिला ठार, १८ प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती गंभीर!

– जखमी प्रवासी जळगाव व नाशिक जिल्ह्यातील; वणी व नाशिक येथे उपचार सुरू!

नाशिक/वणी (कमलेश जोशी) – सप्तशृंगी गडावर मुक्कामी असलेली खामगाव (जि.बुलढाणा) आगाराची बस (क्रमांक एमएच ४० एक्यू ६२५९) ही गडावरून खामगावकडे परत जात असताना, आज (दि.१२) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सप्तशृंगीगडाच्या घाटात गणपती टप्प्यावरून तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १८ प्रवासी जखमी आहेत. त्यातील चालकासह चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वणी व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत व बचावकार्याच्या सूचना केल्यात, तसेच जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. मृत महिलेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली असून, जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.

खामगाव आगाराची असलेली ही बस काल रात्री वणी येथील सप्तशृंगी गडावर मुक्कामी होती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती गडावरून खाली उतरली. दाट धुके व पाऊस असल्याने चालक गजानन टपके यांना घाट वळणाच्या रस्त्याचा अंदाज आला नसावा, त्यामुळे त्यांच्याकडून ही बस गणपती टप्प्यावर येताच तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी बसमध्ये २३ प्रवासी होते. या प्रवाशांच्या किंकाळ्यांच्या आवाजाने गडपरिसर हादरून गेला होता. बसमध्ये असलेले वाहक पुरूषोत्तम टिकार व इतर १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यात चालक टिकार यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. या भयानक घटनेने प्रवासी हादरून गेले होते. केवळ सप्तशृंगीच्या आशीर्वादामुळेच आपले प्राण वाचल्याची भावना या प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

अपघात झाल्यानंतर सप्तशृंगी ट्रस्टचे कर्मचारी, पोलिस, ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रूग्णालयात हलविले. २२ प्रवाशांपैकी १८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. उर्वरित किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली होती. या दुर्घटनेत एका महिला प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात चालक गजानन टपके हे गंभीर जखमी झालेले असल्याची माहिती खामगाव आगाराच्या सहाय्यक व्यवस्थापक शुभांगी पवार यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे. घटनास्थळी पालकमंत्री दादा पाटील भुसे, यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी धावून आले होते. त्यांनी मदत व बचावकार्यास सहकार्य केले. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्हीही उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली होती. त्यांनीही बचाव कार्याच्या सूचना केल्या, तसेच घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

पालकमंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची ही बस आहे. गणपती पॉइंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून, मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही भुसे यांनी सांगितले.


अपघातग्रस्त बस ही रात्री गडावर मुक्कामीच होती. सकाळी प्रवाशांना घेऊन ती खामगावकडे निघाली. चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. घटनेची माहती मिळताच तहसीलदार कळवण, पोलीस प्रशासन, ट्रस्ट व्यवस्थापक व पदाधिकारी, सप्तशृंगगड व नांदुरी स्थानिक ग्रामस्थ मदतकार्यात पोहोचले, आपत्ती व्यवस्थापन विभागानेही मोठी मदत करत जखमींना बाहेर काढले. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून, गडावरील ४ प्रवासी आहेत. इतर दोघांमध्ये बस चालक व कंडक्टरचा समावेश आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ११ रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित ११ रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणांना सूचना केल्या असून, आरोग्य विभाग तातडीने कामाला लागला आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!