आ. राजेंद्र शिंगणेंचे मन वळविण्यासाठी शरद पवार गटांकडून प्रयत्न सुरूच!
– काँग्रेसचा निषेध ठराव; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मनवळविण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः त्यांना फोन केल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. परंतु, शिंगणे यांच्याशी त्यांचा तांत्रिक कारणांमुळे संपर्क होऊ शकला नाही. तथापि, मोठ्या साहेबांनी आपल्या खास माणसांकरवी त्यांना आपल्याकडे राखण्याचे प्रयत्न चालवले आहेत. इतके करूनही डॉ. शिंगणे शरद पवारांसोबत राहिले नाही तर मात्र २०२४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का देण्याची रणनीतीदेखील मुंबईत तयार झाली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. दरम्यान, जिल्हा काँग्रेसने आ. शिंगणे यांच्या निषेधाचा ठराव पारीत केल्याची माहिती असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनीही शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचे निश्चित केल्याने आ. डॉ. शिंगणे यांच्या बंडखोरीला जिल्ह्यात फारसे महत्व प्राप्त झालेले दिसत नाही, असे राजकीय चित्र आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक काल संध्याकाळी बुलढाण्यात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः हा ठराव मांडल्याचे कळते. त्यामुळे जिल्हा काँग्रेसने आ. शिंगणे यांच्याविरोधात दंड थोपाटले असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख नेते, प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी, जिल्हा समितीचे पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख हजर होते. या बैठकीत बूथ समित्या व ग्रामशाखा मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले. येत्या १५ आगस्टपर्यंत काँग्रेसचे जिल्ह्यात मजबूत संघटन उभारण्यासाठी अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
आ. शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत, अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेताना त्याचे खापर विनाकारण काँग्रेसवर फोडल्याबद्दल काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी कुठे जावे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, मात्र त्याचे खापर काँग्रेसच्या माथी फोडू नये, असे सपकाळ यांनी सांगितले. त्यांचे वक्तव्य निषेधार्थ आहे, त्यांच्या लोकसभेच्या दोन निवडणुकीत काँग्रेसने ताकदीने त्यांचा प्रचार केल्याचे सपकाळ यांनी ठणकावून सांगितले व आ. राजेंद्र शिंगणे यांच्या निषेधाचा ठराव मांडला. तो सर्वानुमते पारीत झाल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आ. राजेंद्र शिंगणे हे मुंबईस्थित ‘सिल्वर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी व यशवंतराव चव्हाण केंद्रावर दिसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते बिनधास्त होते. जिल्ह्यात आ. शिंगणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी स्थिती असल्याने या बंडखोरीची लागण जिल्ह्यात होणार नाही, असे सर्वांना वाटले होते. परंतु, डॉ. शिंगणे हेदेखील अजितदादांच्या बंडात सहभागी झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी मात्र शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, ज्येष्ठ नेते प्रसेनजीत पाटील हेदेखील शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आ. शिंगणे यांच्या बंडाला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिलाला नाही, असे चित्र दिसते. जिल्हा बँक आणि लाखो शेतकर्यांचे हित, सहकारी संस्था, सोसायट्या वाचविण्यासाठी बँकेला ३०० कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ ही आमची प्रमुख मागणी अजित पवारांनी मान्य केल्यामुळे आपण दादासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे आ. शिंगणे यांनी सांगितले होते. परंतु, जिल्हा बँकेला तूर्त कोणतेही लोन मिळणे दुरापास्त असून, आ. शिंगणे हे ज्या मुद्द्यावर अजितदादांसोबत जात असल्याचे सांगत आहे, तो तकलादू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
—————-