Breaking newsHead linesVidharbha

राज्यात ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार!

– हे बेगडी सरकार चिरडण्यासाठी मी लढणार – ठाकरे
– उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू, डिग्रस येथे पहिली जाहीर सभा

यवतमाळ/वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक फुल्ल दोन हाफ अशी स्थिती आहे. आमचे सरकार होते तर ते तीन चाकाचे सरकार होते. यांचे सरकार लगेच आता त्रिशूळ सरकार झाले असल्याचे सांगतात. हे बेगडी सरकार चिरडून टाकण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही लढणार असाल तर मी पुढे चालणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना समजावून घेण्यासाठी ठाकरे यांचा विदर्भ दौरा आजपासून सुरु झाला. पोहरादेवीच्या दर्शनानंतर ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ दिग्रस येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी-शाह यांच्यासह राज्य सराकर आणि बदलेली नवीन समीकरणे; यावरुन जोरदार टीकास्र सोडले. शिवाय, पोहरादेवी संस्थानने दिलेल्या आशीर्वादाचाही उल्लेख केला.

ठाकरे म्हणाले, की राज्यात सध्या सुरु असलेले फोडाफोडीचे राजकारण अत्यंत चुकीचे असून, त्यामुळे एक घातक पायंडा पडत आहे. आमदारांच्या अपात्रतेबद्दल विशिष्ट चौकटीत राहून निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यांनी चौकट मोडल्यास आम्हाला दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले असतील, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. अनेक शिवसैनिक माझ्या संपर्कात असून, नवीन माणसेही शिवसेनेत येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच, राज्यात सध्या गद्दारांचे आणि लाचार्‍यांचे सरकार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे नाव खराब झाले, अशी टीका ठाकरे यांनी केली. एखाद्या पक्षालाच संपवून टाकण्याची वृत्ती नष्ट केली पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला पुन्हा गौरवशाली स्थान मिळवून देण्यासाठी मी लढत आहे.

यावेळी त्यांनी मंत्री संजय राठोडांवरही निशाणा साधला. २०० रुपये हफ्ता घेणार्‍याला मंत्री कुणी केले. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हते, असा टोला उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना लगावला. तसेच भाजप आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. अनेक नेत्यांना मोठ्या कष्टाने भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत, असेही ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर संत रामराव महाराज, बामनलाल महाराज आणि जेतालाल महाराजांचेंही त्यांनी दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!