BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

जिल्हा बँकेला पुनर्जीवित करण्याचा अजितदादांचा शब्द अन् आ.डॉ. राजेंद्र शिंगणे दादांच्या गोटात!

– शरद पवार गटाकडून आ. डॉ. शिंगणेंचे मन वळविण्याचे प्रयत्न
– आ. डॉ. राजेंद्र शिंगणे समर्थकांसह अजित पवार गटाच्या वाटेवर!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला मदत करणार असतील तर आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपली भूमिका आज ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, अजित पवारांनी जिल्हा बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने डॉ. शिंगणे हे अजितदादांच्या गटात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही डॉ. शिंगणे यांच्याशी संपर्क साधून, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वासनीय सूत्राने दिली आहे. वेगाने घडणार्‍या राजकीय घडामोडी पाहाता, डॉ. शिंगणे अंतिमतः काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अजित पवार यांनी फोन केला. जिल्हा बँकेसंदर्भात मदत करणार असल्याचे आश्वासन अजितदादांनी शिंगणे यांना दिले. कालपर्यंत डॉ. शिंगणे शरद पवारांचाच पाईक असल्याचे सांगत होते; मात्र अजित पवारांच्या फोननंतर त्यांनी आज अचानक भूमिका बदलली असल्याचे समोर आले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी आणि काँग्रेसने खूप त्रास दिला, असे सांगत, डॉ. शिंगणे यांनी आपली खदखद बाहेर काढली. ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या वडिलांनी, आईंनी आणि त्यांनीसुद्धा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील शेतकर्‍यांची असलेली जिल्हा सहकारी बँकचे कामकाज पाहिले आहे. या काळात ही जिल्हा सहकारी बँक अडचणीत आली होती. शेतकर्‍यांना पीककर्ज मिळत नव्हते. मात्र मध्यंतरी विरोधीपक्षामध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब यांनी या बँकेला मदत केली होती. सध्याही जिल्हा सहकारी बँकेच्या नाजूक परिस्थितीबाबतची ही गोष्ट अजितदादांना माहित होती. अजित पवारांनी मला बोलावून सांगितले की, तुम्ही माझ्यासोबत काम करण्याची भूमिका घेतली तर मी याच्यामध्ये पुढाकार घेऊन तुम्हाला मदत करू शकतो. त्यांनी तशी भूमिका माझ्यासमोर मांडली, त्यामुळे मीसुद्धा अलिकडच्या काळामध्ये अजितदादांच्या बरोबर आपण राहायला पाहिजे, बँक सुधारली पाहिजे, बँक पुढे गेली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काही जरी त्याग करावा लागला तरी ती करण्याची माझी तयारी आहे, या भूमिकेतून अजितदादांसोबत जाण्याचा माझा विचार करत आहे, असा खुलासा डॉ. शिंगणे यांनी केला. यामुळे आ. शिंगणे हे अजित पवार गटासोबत जाणे जवळपास निश्चित झालेले आहे. तथापि, अद्याप निर्णय झालेला नाही, असेही डॉ. शिंगणे म्हणाले आहेत.


परवादिवशी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडील बैठकीला आमदार डॉ. शिंगणे यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातून माजी आ. सौ. रेखाताई खेडेकर, प्रसेनजीत पाटील, पांडुरंगदादा पाटील, नरेश शेळके, संतोष रायपुरे, साहेबराव सरदार, सुमित सरदार, अनिल बावस्कर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. यामुळे अजितदादांच्या बंडखोरीचा जिल्ह्यात फारसा परिणाम होणार नाही, असे राजकीय चित्र होते. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही डॉ. शिंगणे यांनी ‘मला दादांची ऑफर होती, पण ती विनम्रपणे नाकारली. मी मोठ्या साहेबांसोबतच राहणार आहे’, असे स्पष्ट केले होते. परंतु, अजितदादांच्या एका फोननंतर चक्रे फिरली असून, डॉ. शिंगणे हे अजितदादांसोबत जाणे जवळपास निश्चित झाले आहे. तसे झाले तर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजित पवारांच्या गोटात जाणार आहे. तर डॉ. शिंगणे हे अजितदादांसोबत गेले तर जिल्हा राष्ट्रवादीचे नेतृत्व माजी आ. सौ. रेखाताई खेडेकर यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!