Breaking newsHead linesMumbaiPolitical NewsPoliticsWomen's World

राजकारणातून दोन महिने ‘ब्रेक’ घेणार; पंकजा मुंडे यांची घोषणा

– परळीत पुढच्या निवडणुकीत काय? याचे उत्तर राष्ट्रवादीला सोबत घेणारे देतील!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री पंकजा मुंडे-पालवे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली असताना, या चर्चेवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, ही बातमी देणार्‍या वृत्तवाहिनीला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. तसेच, सद्याच्या राजकारणाचा कंटाळा आला असून, मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. मी दोन महिने सुट्टी घेत असून, अंतर्मुख होऊन विचार करणार आहे, घोषणाही पंकजा यांनी केली.

पंकजा मुंडे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवेशाचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले. पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. यासंदर्भात अनेक तर्क-वितर्कही लावले जात होते. त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याचेही दावे केले जात होते. मात्र, आज पंकजा यांनी पत्रकार परिषदेत ते सर्व दावे खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले. आपण पक्ष सोडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चा तूर्तास थांबल्या असल्या तरी, या स्पष्टीकरणासोबतच पंकजा मुंडेंनी आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की परळी विधानसभा मतदारसंघात पुढच्या निवडणुकीत नेमके काय होईल, याचे उत्तर ज्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला ते देतील. पक्षात एक व्यवस्था आहे, ते यावर बोलू शकतील. धनंजय मुंडे यांनी शपथ घेतल्यानंतर मला फोन केला होता. ते मला भेटायला आले होते. आपल्या संस्कृतीनुसार ते आले तेव्हा मी त्यांचे औक्षण केले. मंत्री झाले त्याचा आनंदच आहे. गेल्या २० वर्षांत मी एकदाही सुट्टी घेतलेली नाही. आता मला थोडा ब्रेक घ्यावा लागणार आहे. मी ऑफिशियल सुट्टी घेणार आहे. अंतर्मुख होऊन विचार करणार आहे. विचारांशी तडजोड करावी लागेल, अशी वेळ आल्यास मी राजकारणाला रामराम ठोकेन. सध्याच्या राजकारणातले प्रयोग कोविडसारखे नवीन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही, असे बोलले जाते. पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींचा भाजप राहिला नाही, असे कुणी म्हणू नये, असे मला वाटते. भाजप फुटेल असा दिवस येऊ नये, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या संबंधितांना लगावला.

मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना समोरासमोर पाहिलेलेही नाही, असे सांगून पंकजा म्हणाल्या, की मी कुठलीही गुप्तता पाळत नाही. जे काही असते ते सोशल मीडियात दिसते. भारतीय जनता पक्षाचे विचार माझ्या रक्तात आहेत. पक्षाचा प्रत्येक आदेश मी शिरसावंद्य मानला. मग अशी बातमी का येते? या चॅनेलला माहिती कोणी दिली? असा सवाल करत, माझे करिअर कवडीमोलाचे नाही. २० वर्षे मी राजकारणात आहे. माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार झाले आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचा माझा स्वभाव नाही, असे सांगून त्यांनी खोटी बातमी देणार्‍या वृत्तवाहिनीला नोटीस पाठविणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर अनेक घटना घडल्या. निर्णय झाले. त्यानंतर मी नाराज असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या. त्यावर मी भूमिका मांडली आहे. पुन्हा-पुन्हा मी त्यावर बोलणे हे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे, असेही पंकजा मुंडे-पालवे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!