सोलापूर (संदीप येरवडे) – छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे केवळ शरीरावर शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. तर रुग्णाच्या मनावरदेखील शस्त्रक्रिया करण्याचे काम सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर करीत आहेत. त्याचाच प्रत्यय एका जटा धारण केलेल्या महिलेला जटापासून मुक्त केले. शांताबाई श्रावण जाधव (वय वर्षे ८५, राहणार सावरखेड, दक्षिण सोलापूर) पंधरा वर्षांपूर्वी केसांचा गुंता झाला म्हणून देवी आली समजून खेडेगावातील रुढी परंपरांप्रमाणे सर्व सोपस्कार केले व तेंव्हापासून जटा वाढवून परडी घेवून राहू लागल्या. केस विंचरायचे नाहीत, धुवायचे नाहीत, धुतलेच तर जटांमुळे लवकर वाळायचे नाहीत. खाज सुटायची, जंतूसंसर्ग व्हायचा पण अंधरुढी परंपरांच्या नावाखाली ही माऊली त्या जटाचे ओझे डोक्यावर पेलत होती.
२४ मे रोजी लहानसा अपघात झाल्यावर त्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे उपचारासाठी दाखल झाल्या. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख डॉ. ऋत्विक जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख डॉ. औदुंबर मस्के तसेच डॉ. सचिन जाधव, डॉ. शुक्लधन रोडे, डॉ. सतिश सुरवसे, डॉ. निवेदिता, डॉ. किरण जमखंडी, डॉ. ऐश्वर्या बस्तावाडे, डॉ. हेमंत आदी डॉक्टरांची टीम उपचार करत होती. उपचारादरम्यान जटांमुळे होणारा शारीरिक त्रास व जंतूसंसर्गाचा धोका ओळखून डॉक्टरांनी, शांताबाई जाधव व त्यांचा मुलगा सुरेश जाधव यांचे समुपदेशन करायला सुरुवात केली. सुरेश जाधव तयार झाले. परंतु शांताबाईंवर मात्र रुढी परंपरांचा मोठा पगडा होता. त्यामुळे त्या तयार नव्हत्या. डॉक्टरांनी त्यांना वारंवार समुपदेशन करुन स्वच्छ राहण्याचे महत्त्व पटवून दिले. यामुळे जंतूसंसर्ग होणार नाही व तुमचा आजार कमी होईल, असे सांगितले. शेवटी त्या जटा काढण्यासाठी तयार झाल्या. आणि २७ जून रोजी शांताबाईंच्या संमतीने त्यांच्या जटा काढण्यात आल्या. १५ वर्षांपासून अंधश्रद्धेच्या विळख्यात असणार्या शांताबाईंना जटांपासून मुक्ती मिळाली. ५५ वर्षाच्या त्यांच्या मुलाच्या , सुरेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ‘आम्ही जे करु शकलो नाही ते डॉक्टरांनी माझ्या आईसाठी करून दाखवलं’ असे उदगार त्यांनी सदगदीत होऊन काढले.
शांताबाईंना पण आता डोक्यावरच्या जटा गेल्यामुळे हलके व मोकळे वाटत आहे. बॉयकट झालेल्या त्यांच्या चेहर्यावर पंधरा वर्षांपासूनच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद ओसंडून वहात आहे. रुग्ण शांताबाई यांना जटा काढण्यासाठी तयार करण्यात डॉ. सतीश सुरवसे यांनी मोलाची भुमिका बजावली. रुग्णसेवेसोबतच सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत समाजप्रबोधन करणार्या व ‘रोगमुक्ती सोबतच जटामुक्ती’ करणार्या डॉक्टरांच्या टिमचे मा. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी कौतुक केले.
———-