AalandiHead linesPachhim Maharashtra

अलंकापुरीत आषाढी एकादशीदिनी लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी दिनी भाविकांनी श्रीचे दर्शनास हरीनाम गजर करीत रांगा लावून श्रींचे दर्शनास गर्दी केली. परिसरातून आलेल्या भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. परंपरेने श्रींचे पालखीची ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. भाविकांनी इंद्रायणी नदीवर गर्दी करून तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीचे पाण्याने आचमन करीत स्थान महात्म्य जोपासले.

आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशी दिनी ब्रम्हवृंदांचे हस्ते श्रीची पूजा, आरती, दुधारती झाली. एकादशी दिनी श्रींना फराळाचा महानैवेद्य झाला. या प्रसंगी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणे दरम्यान भाविकांनी रस्त्याचे दुतर्फ़ा गर्दी करून दर्शन घेतले. परंपरेने हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा चक्रांकित महाराज यांचे तर्फे रुजू झाली. या प्रसंगी आळंदी संस्थांचे मानकरी, पुजारी, सेवक, आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक उपस्थित होते. मंदिरातील दर्शन बारीत रामवाड्या समोरून रांगा लावून भाविकांनी दर्शनास गर्दी करीत श्रीचे समाधी दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाल्याचे पुरुषोत्तम डहाके, महेश गोखले यांनी सांगितले. भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले होते. आळंदी पोलिस, मंदिरा तील सुरक्षा रक्षक, सेवक यांनी दर्शन बारीसह पोलीस बंदोबस्त नियोजन उत्साहात झाले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनी गोडसे, वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचेसह आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी ठेवत सुरक्षित, सुरळीत दर्शनबारीसह, वाहतुकीचे नियोजन परिश्रम पूर्वक केले. उद्योजक राहुल चव्हाण यांचेसह आळंदी संस्थानचे वतीने भाविकांना फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भागवत काटकर, सचिन महाराज शिंदे, किरण कोल्हे, माऊली उर्फ डी.डी. घुंडरे पाटील आळंदी संस्थांनच्या वतीने पिण्याचे पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. एकादशी निमित्त आलेल्या भाविक-वारकरी यांनी येथील मंदिर आणि नगरप्रदक्षिणा हरीनाम गजरात केली. प्रदक्षिणा मार्गावरून श्रींचे पालखीची हरिनाम गजरात नगर प्रदक्षिणा झाली. भाविकांची अनवाणी पायाने होणारी नगरप्रदक्षिणा प्रशस्त नगरप्रदक्षिणा मार्ग विकसित झाल्याने सुखकर झाली. एकादशी निमित्त आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे परिसरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने भरले होते.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा

आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर यांचे सह तापकीर परिवाराच्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत श्री पांडुरंगाची महापूजा करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी माता आणि माऊलींचे मूर्तीची महापूजा अभिषेक हरिनाम गजरात करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत दही, दूध, मधाचा, सुगंधित अभिषेक करण्यात आला. श्री पांडुरंग, श्री रुक्मिणी माता आणि माऊलींचे वैभवी मूर्तीची महापूजा उत्साहात करण्यात आली. यावेळी हिरामण बर्डे, रामनंदा बुर्डे, मंगेश गराडे, पूजा गराडे,ह.भ.प. रमेश घोंगडे, राजेंद्र नाणेकर, हर्षल अरबट, शिवाजी तळेकर आदीसह माऊली भक्त भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या निमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनास उपस्थित होते. महापूजा नंतर श्रींना महाप्रसाद नैवेद्य वाढविण्यात आला. भाविकांना आषाढी एकादशी निमित् महा प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज बिराजदार यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. मंदिरात एकादशी निमित्त आकर्षक पुष्प सजावट व रांगोळी लक्षवेधी रेखाटण्यात आली होती.


हरिपाठ कीर्तनसेवेस उत्साही प्रतिसाद

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली. माउली मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत हरिपाठ कीर्तन सेवेस भाविकांनी गर्दी केली. श्रींचे पालखीचे आषाढीस पंढरपूरला जाण्यास प्रस्थान झाल्यानंतर ते श्रींची पालखी आळंदीत परत येई पर्यंत येथील विष्णुबुवा चक्रांकित महाराज यांचे परिवाराचे वतीने कीर्तन सेवेची परंपरा आहे. श्रींचे विना मंडपात हरिपाठावर आधारित माउली मंदिरात कीर्तन सेवा परंपरा आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे पालखीचे दर्शन घेतले. श्रींचे पालखीचे मंदिरात प्रदक्षिणेनंतर आगमन झाले. यावेळी मानक-याना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला.

भाविकांचा प्रसाद वाटपास उत्साही प्रतिसाद

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक राहुल चव्हाण परिवारा तर्फे माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुमारे ५० किलोवर तयार खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी देखील या उपक्रमास प्रतिसाद देत उपक्रमाचे स्वागत केले. उद्योजक राहुल चव्हाण आळंदी मंदिरातील दर एकादशी, आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र व इतर कार्यक्रम प्रसंगी भाविकांना महाप्रसाद, खिचडी, चहा पान, मसाले दूध, राजगिऱ्याचे लाडू, केळी व इतर उपवासाचे पदार्थ वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. खिचडी प्रसाद वाटप प्रसंगी आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, साईनाथ ताम्हणे, हिरामण तळेकर, भागवत काटकर, किरण कोल्हे. विनोद गायकवाड, मयूर कुऱ्हाडे, उदय महाराज अडवळे, शुभम ताम्हणे, पंकज पाखरे, अविनाश राळे, दिनेश कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, ज्ञानेश्वर घुंडरे, बाबुराव मोरे, महादेव पाखरे, सचिन शिंदे,राज कदम, सचिन घोंगडे, व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या खिचडी वाटप कार्यक्रमात सहभागी झाले होते. खिचडी वाटपा नंतर सर्वांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आळंदी स्वकाम सेवा मंडळ तसेच आळंदी देवस्थानचे सेवक,कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!