बुलढाणा( संजय निकाळजे ) : छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या शतकात वृक्षांचे महत्त्व जाणले. झाडे तोडू नये यासाठी आज्ञापत्र काढले. ही डोळस दृष्टी आज नाहीसी झाली असून, सर्रास वृक्षतोड होत आहे. महाराजांचा द्रष्टा विचार समजण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारे त्यांचे आज्ञापत्र लावण्यात यावे, अशी मागणी वृक्षमित्र मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ व वृक्षप्रेमी यांनी जिल्हाधिकारी व न. प. मुख्याधिकारी यांच्याकडे २८ जून रोजी केली.
अप्पर जिल्हाधिकार्यांना आज्ञापत्राची फ्रेम भेट देण्यात आली. सोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद सीईओ व नगरपालिका सीईओ यांना ‘शिवरायांचे आज्ञापत्र’ भेट देण्यात येत आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश सरकार दरवर्षी देत असते. मात्र एकाच एक खड्ड्यात दरवर्षी वृक्षारोपण होते. हे देखील वास्तव आहे. वन आच्छादन झपाट्याने कमी होत आहे. परिणामी दरवर्षी तापमान वाढ होत आहे. ही जीवघेणी तापमान वाढ सध्या आपण अनुभवतोय. ती रोखण्यासाठी वृक्ष लागवड हा उपाय आहे. सध्या पावसाळा लागत असून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. सरकारी पातळीवर तसेच वैयक्तिक वृक्षारोपणाला चालना देण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारे शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र शाळा व सरकारी कॉलेजच्या दर्शनी भागात लावावे, अशी मागणी सुनील सपकाळ व वृक्षाप्रेमी मित्र मंडळाकडून करण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालयातील मोकळ्या जागा व वनविभागाच्या जागेत वृक्षारोपणास संधी असल्याचे वृक्षप्रेमी मित्र मंडळाने म्हटले आहे. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप जाधव, डॉ. पुरुषोत्तम देवकर, पत्रकार गणेश निकम, पत्रकार रणजितसिंग राजपूत, सोहम घाडगे, कासीम शेख, प्रा. विजय घ्याळ, शौकत शहा, राम हिंगे, सतीश मेहेन्द्रे, प्राचार्य सुनील जवंजाळ, अनंता लहासे, पर्यावरण मित्र प्रदीप डांगे आदींची उपस्थिती होती.
अन अप्पर जिल्हाधिकारी भारावले
वृक्षप्रेमी मित्र मंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी काढलेले आज्ञापत्र प्रâेम करून दिले. सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयात हे आज्ञापत्र लावण्यासाठी सूचना निगर्मित करावी, अशी मागणी केली. ही अनोखी भेट पाहून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे देखील भारावले.
काय आहे आज्ञापत्र..
स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही एक लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची. परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय म्हणून की ही झाडे वर्षात दोन वर्षांनी होतात ऐसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडल्यावर त्यांचे दुःखात परावर काय?
– (शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र)