राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनिश्चितता!
– मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट नेमकी कशासाठी?
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी, ही भेट म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातील सर्व अडचणी झाल्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. जुलैत मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी सांगितले. तथापि, मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाहांची घेतलेली भेट ही संभाव्य १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील असल्याची माहिती राजकीय सूत्राने दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर फुटलेले ४० आमदार शिंदे यांच्यासोबत राहतील की नाही, याची काहीही खात्री नसल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जात आहे, असेही हे सूत्र म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहरे देण्यावर या सरकारचा भर राहणार असल्याचे राजकीय सूत्राने सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय, आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
———-