मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना!
– मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळांचे वाटप यावर निर्णय शक्य
– मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलण्यासाठी राजकीय हालचालींची शक्यता?
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळांचे वाटप, मुंबई महापालिका निवडणुका आणि अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले असून, आज रात्रीच त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट होणार आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळांचे वाटप यावरील चेहर्यांची यादी फायनल होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ संभाव्य असून, त्यात मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल व रूख्मिणी मातेची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लगेचच पंढरपुरातून मुंबईत परत आले. आणि, सायंकाळच्या सुमारास ते तातडीने नवी दिल्लीकडे निघाले. विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली, तेथे बराचवेळ या दोन नेत्यांत खलबते सुरू होती. आज रात्रीच शिंदे यांची अमित शाह यांच्याशी भेट होणार असून, या भेटीत महत्वपूर्ण निर्णय होणार आहेत.
दरम्यान, राज्यातील एका दिग्गज नेत्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला धक्कादायक माहिती दिली आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात धक्कादायक चित्र दिसणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व बदलले जाणार आहे. राज्यातील एक पॉवरफुल्ल नेता आपल्या काही समर्थक आमदारांसह भाजपमध्ये येण्याची शक्यता असून, या नेत्याचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार करण्याचे नियोजन भाजपने चालवले आहे. देवेंद्र फडणवीस व या पॉवरफुल नेत्याच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जाणार असून, त्यामुळे शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमित शाह यांनी त्यांना तातडीने दिल्लीत बोलावले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करून मुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी ते औटघटकेचे ठरण्याची शक्यताही या राजकीय नेत्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली.
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक बदल आणि केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी माहिती बैठकीनंतर बाहेर आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आहे. नार्वेकर यांनी आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे. या घटनेचा अभ्यास करून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाणार आहे. यावर सल्ला मसलत करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली आहे.
येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 2 किंवा 3 खासदरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्याताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर महिला म्हणून खासदार भावना गवळी यांचं नावही आघाडीवर आहे.