सिंदखेडराजा/चिखली (सचिन खंडारे/ महेंद्र हिवाळे) – यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. या दोन्ही सणांचे पावित्र्य पाहाता, मुस्लीम बांधवांनी बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादिवशीच्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला असून, हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन घडविले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या आवाहनानुसार, चिखली व साखरखेर्डा पोलिस ठाणेहद्दीतील मुस्लीम बांधवांनी हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे हिंदू बांधवांनीदेखील स्वागत केले असून, मुस्लीम बांधवांप्रती आभार व्यक्त केले आहेत.
येत्या २९ जूनला आषाढी एकादशी हा हिंदू बांधवांचा सर्वात आध्यात्मिक उत्सव आणि त्याच दिवशी समस्त मुस्लीम बांधवांचा पवित्र सण म्हणजेच बकर ईदसुद्धा आल्याने व दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे बकर ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय साखरखेर्डा येथील सर्व मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. तसेच, चिखली शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधवांनीदेखील असाच निर्णय घेतला आहे. यासंदर्भात चिखली पोलिस स्टेशनला २७ जूनरोजी मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये चिखली येथील मुस्लीम बांधवांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवून दिले. हिंदू-मुस्लीम बांधवांतील सामाजिक एकोपा टिकून राहावा, यासाठी चिखली शहरातील मुस्लीम बांधवांनी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा तसेच मांसविक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
साखरखेर्डा हे सिंदखेडराजा तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी एक हजार वर्षापेक्षा जास्त आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेला पलसिद्ध महास्वामीजींचा पुरातन मठ आहे. निजामकालीन ५०० ते ६०० वर्षे जुनी ऐतिहासिक दगडी जामा मशीद आहे. श्री प्रल्हाद महाराज यांचा मठ आहे. हजरत अनामत खाँ ‘शहीद रहेमतुल्लाह अलैह ‘यांचा सर्व धर्मीयांचा पवित्र दर्गा आहे. पंचमुखी हनुमान मंदिरे व राम मंदिर आहे. अशा या ऐतिहासिक भूमी लाभलेल्या साखरखेर्डामध्ये सामाजिक सलोखा व प्रत्येक समाजाचा सण उत्सव एकामेकांच्या सणांमध्ये सहभागी होऊन एकत्रित साजरे करण्याची पद्धत आहे. म्हणून जातीय सलोखा अबाधित राखला गेला पाहिजे, हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजामध्ये आनंदीमय उत्साही वातावरण निर्माण राहिले पाहिजे, म्हणून कुर्बानी न देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. कुर्बानी न देण्याचा निर्णयाची प्रत समस्त मुस्लीम बांधवांच्यावतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.
दुसरीकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे व अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबराव वाघ उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी चिखली शहरातील मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, मशीद, दर्गाचे ट्रस्टी, मौलवी यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकता वाढीस लागण्याकरिता चिखली येथील मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने आषाढी एकादशीच्या दिवशी मांसविक्री व कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय हा कौतुकास्पद असून, या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
————