आषाढीच्या दिवशी कुर्बानी, मांसविक्री नाही; मुस्लीम बांधवांचा स्तुत्य निर्णय!
– ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या हाकेला मुस्लीम बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – यंदा मुस्लीम बांधवांचा बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी आलेले आहेत. हे दोन्ही सण दोन्ही धर्मियांसाठी महत्वपूर्ण आहेत. आषाढी एकादशीचे महत्व लक्षात घेता, मुस्लीम बांधवांनी या दिवशी कुर्बानी न देण्याचा, तसेच मांसविक्री न करण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार, अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील कोणत्याही गावात बकरी किंवा बोकडाची कुर्बानी दिली जाणार नाही. या निर्णयाने हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन घडले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, पिंपळवाडी, मेरा खुर्द, इसरुळ, मेंडगाव, अंढेरा या गावांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी हिंदू-मुस्लीम एकोप्याचे दर्शन बांधवांमध्ये पाहायला मिळणार आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. हिंदू बांधवांसाठी फार मोठा दिवस असून, पंढरपूर येथे एकीकडे विठू माऊलींची पूजा होत असताना कुर्बानीमुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावू नये, म्हणून येथील मुस्लीम समाजाने बकरी ईद या सणानिमित्त देण्यात येणारी कुर्बानी दुसर्या दिवशी म्हणजे ३० जूनरोजी देण्याचे ठरविले आहे. मेरा खुर्द, शेळगाव आटोळ, मेंडगाव, इसरुळ, अंढेरा येथील मुस्लीम बांधवांनी अंढेरा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला.
तसेच, या दिवशी मांसविक्री न करण्याचा निर्णयदेखील चिखली तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे प्रत्येकाला आषाढीची आतुरता लागून आहे. याच दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. मात्र या सणाच्या निमित्ताने देऊळगाव राजा तालुक्यातील व चिखली तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन बघायला मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लीम बांधवांच्यावतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून, कौतुक होत आहे. यावेळी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गणेश हिवरकर, दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, सिद्धार्थ सोनकांबळे, मानसिंग राठोड, पवार हे हजर होते.