Breaking newsHead linesPuneWomen's WorldWorld update

माढ्याच्या पठ्ठ्यानं जीव धोक्यात घालून तरूणीला वाचवले!

– तरूणी जीवाच्या आकांताने पळत होती, तो कोयता घेऊन मागे लागला; पुणे हादरले!

पुणे (सोनिया नागरे) – नवी दिल्लीतील थरारक अशा दर्शना हत्याकांडाची पुनर्आवृत्ती शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात तरूणांच्या सतर्कतेने व धाडसाने टळली आहे. एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेत घडला. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२ रा. मुळशी डोंगरगाव) असे हल्लेखोराचे नाव असून, एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले. त्याने आज सकाळी सदाशिव पेठ नारळीकर इन्स्टिट्यूटच्या समोरच्या लेनमध्ये एका २० वर्षीय युवतीवर वार करून तिला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, लेशपाल जवळगे या तेथून जाणार्‍या माढ्यातील सोलापूरच्या तरूणाने जीव धोक्यात घालून या तरूणीला वाचविले. काही तरूण व नागरिकांनी हल्लेखोरावर पडेल त्या वस्तूने हल्ला केल्याने हल्लेखोर बिथरला, त्यानंतर जमावाने त्याला एका खोलीत डांबून ठेवत, पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने राज्य हादरले असून, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागत, राज्यात महिला व मुली सुरक्षित नसल्याची टीका केली. तर, तरूणीचा जीव वाचविणार्‍या लेशपाल जवळगे या तरूणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

घटनेची परिस्थिती एवढी भयानक होती, की पुण्यातल्या मध्यवस्तीत सदाशिव पेठ भागात टिळक रोड ते पेरु गेट पोलीस स्टेशनपर्यंत मुलगी आपला जीव वाचवत पळत होती. मात्र काही स्थानिक रहिवासी आणि लेशपाल जवळगे आणि त्याच्या मित्राच्या प्रसंगावधानामुळे या तरुणीचा जीव वाचला. लेशपाल जवळगे हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, एक वर्ष नोकरी केली आणि आता तो २०१८ पासून पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. त्याचे आई-वडिल आढेगावात शेती करतात.

दरम्यान, या घटनेनंतर केवळ पुणेच नाही तर राज्यदेखील हादरले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना आरोपीवर मोक्का लावण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आज सकाळी तरुणीवर हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या तरुणीला वाचवण्यात स्थानिक तरुण लेशपाल जवळगे याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले. लेशपालचे मनापासून आभार! शासनाने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसंगी दोषींवर मोक्काप्रमाणे कलमे लावून, गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


अजितदादा संतापले..

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचे दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्याने हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुर्‍यातून कायदा आणि सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेले पुणे इतके हिंस्त्र झालेले यापूर्वी कधीच पाहिले नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असे ट्विट अजित पवार यांनी करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!