शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जैन गल्ली येथे गोपीकिशन बलदवा यांच्या घरात चोरट्याने चोरी करुन गोपीकिशन बलदवा आणि त्यांच्या भावजय पुष्पा बलदवा यांची हत्या केली होती. या हत्याकांड व दरोड्यातील आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने बिडकीन (ता. पैठण) येथून जेरबंद केल्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खेडकर डाबर चव्हाण (वय ३२, रा. म्हारोळा बिडकीन ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, खून व मोक्काअंतर्गत विविध सात प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काल शेवगाव पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत या घटनेचा उलगडा केला होता. दरम्यान, वारंवार घडणारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे रोखण्यात शेवगाव पोलिसांना अपयश येत असल्याने जिल्ह्यात या पोलिस ठाण्याचे नाव प्रचंड खराब झालेले आहे.
बलदवा यांच्या हत्येनंतर शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. येथील व्यापार्यांनी त्याच दिवशी बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवत आरोपीच्या अटकेची मागणी केली. यासोबतच २४ तारखेला माहेश्वरी संघटनेने मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीला जेरबंद करण्यात यश आले, तर अटक करण्यात आलेल्या खेडकर चव्हाण याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज येथे एक, बिडकीन येथे तीन, बेगमपुरा येथे एक तर शिलेगाव पोलीस ठाण्यात दोन असे दरोडा, खून व मोक्काअंतर्गत सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयाने शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देत, ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
बलदवा कुटुंबियांच्या घरावर २३ जूनरोजी पहाटे दरोडा पडला. या घटनेत दरोडेखोराने केलेल्या मारहाणीत गोपीकिसन बलदवा (वय ५५ वर्षे) आणि त्यांची भावजय पुष्पा बलदवा (वय ६५ वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला. तर गोपीकिसन बलदवा यांच्या पत्नी सुनिता बलदवा यांना वीट फेकून मारली गेल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरोडेखोराने डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. बलदवा यांच्या एका मित्राने गावाला जायचे म्हणून काही रक्कम त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती, तीदेखील या दरोडेखोराने लंपास केली. अंदाजे पाच लाखांचा ऐवज या दरोडेखोराने लंपास केला असून, या गुन्ह्यात तो खरेच एकटा होती की, आणखी काही साथीदार होते? याचा तपास ‘एलसीबी’चे पथक करत आहेत.
—————-