Breaking newsHead linesPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsSOLAPUR

‘केसीआर’ यांची ६०० गाड्यांच्या ताफ्यांसह सोलापुरात एण्ट्री!

– काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपनेही घेतला धसका!

सोलापूर (संदीप येरवडे) – भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे सोलापुरात दमदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, केसीआरला पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची एवढी प्रचंड गर्दी होती की, या गर्दीचा धसका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपनेही घेतला असल्याचे जाणवले.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यासह जवळपास ६०० गाड्यांचा ताफा होता. आपल्या मंत्रिमंडळासह आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी हैदराबादहून सोलापूरकडे ते आले आहेत. त्यांच्याबरोबर पक्षाचे आमदार-खासदार व प्रमुख नेत्यांसह सुमारे सहाशे मोटारींचा ताफा आहे. सोलापुरात आल्यानंतर कार्यकर्त्यानी गुलाबफुलांची उधळण करित त्यांचे जोरदार स्वागत केले. केसीआर यांच्या ग्रॅन्ड एंट्रीने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. सोलापुरातील पंचतारांकीत हॉटेल बालाजी सरोवर येथे त्यांचा विसावा झाला. त्यानंतर ते माजी खासदार धर्मांण्णा साधूल यांच्या निवासस्थानाकडे गेले. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यासह सहाशे गाड्यांच्या ताफ्यामुळे शहरातील सात रस्ता परिसरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसाचा ठीकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता.

सोलापुरात रात्रीच्या मुक्कामानंतर उद्या, मंगळवारी सकाळी केसीआर व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आमदार-खासदार पंढरपूरला रवाना होणार आहेत. त्यानंतर पंढरपुरात सरकोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या गावात सरकोली येथे केसाआर व त्यांचे सहकारी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी भगीरथ भालके हे आपल्या सहकार्‍यांसह बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
हॉटेलांमध्ये २२५ खोल्यांची सोय करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी शहरात तेलुगू भाषकांच्या प्रभावाखालील पूर्व भागात अनेक ठिकाणी भारत राष्ट्र समिती पक्षाचे ध्वज उभारण्यात आले आहेत. दरम्यान, बीआर एसरच्या सोलापूरमध्ये रॉयल इंट्रीने काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप पक्षांनेही त्याचा धसका घेतला आहे. कारण येथील स्थानिक कार्यकर्ते बीआरएस पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे आगामी होणार्‍या निवडणुकांमध्ये याचा कोणाला फटका बसणार ही चिंता लागली आहे.


माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव करून राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या दिवंगत आमदार भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत बीआरएस पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते आपल्या सरकोली या गावात तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपुरात सुरुंग लागला आहे. भारत भालकेंना मानणारा मोठा गट हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आहे. भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशानं पंढरपुरातील राजकीय समीकरण बदलणार आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपलाही भालके गटाचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!