किनगावजट्टू, ता. लोणार (जयजीत आडे) – लोणार तालुक्यासह किनगावजट्टू परिसरात रिपरिप पाऊस सुरू असून, मागीलवर्षी झालेल्या झडीसदृश पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे. पाऊस कमी असल्याने पेरण्यांचा वेगही मंदावलेला आहे. पारंपरिक तिफणींपेक्षा ट्रॅक्टरवरील मिनी पेरणीयंत्रणाने पेरण्यांकडे शेतकर्यांचा कल दिसून येत आहे.
दरवर्षी रोहिणी, मृग या नक्षत्रात पावसाची सुरुवात होत असते. यावर्षी महाराष्ट्रात केरळमार्गे पाऊस दाखल झाला असतांनाच बीपरजॉय चक्रीवादळ आले व संपूर्ण बाष्पयुक्त ढग या चक्रीवादळामुळे अस्ताव्यस्त झाले. त्यामुळे पावसाची गती मंदावली. मागील काही दिवसांपासून हवामानतज्ज्ञांनी आपआपल्या प्रमाणे अंदाजसुध्दा वर्तविले. परंतु, हे अंदाज मांडणारे काही अंशी फेल ठरलेत. सालाबादप्रमाणे मृग नक्षत्राच्या मध्यावर शेतकर्यांच्या पेरण्या सुरू होतात. यांत्रिकीकरणाच्या युगात ट्रॅक्टर, मिनी पेरणी यंत्र, बैलचलीत तिफणी आदी साधनांद्वारे पेरण्या आठ दहा दिवसात उरकल्या जातात. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्र लागून चार दिवसानंतर आज पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. पेरणी करिता आवश्यक खते, बीबियाणे, बीज प्रक्रिया करिता लागणारी औषधी खरेदी केली जात आहेत. तथापि, शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पेरणी झाल्यावरच शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद दिसेल, एवढे मात्र खरे.
————-