Breaking newsHead linesMumbaiPuneVidharbha

मान्सूनने राज्य व्यापले, तिफणी हालल्या!

– यंदा तब्बल एक महिना उशिरा मान्सूनचे आगमन! पुणे, मुंबईत संततधार!

पुणे/मुंबई (प्रतिनिधी) – कालपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला असून, मुंबई, पुण्यात संततधार सुरू आहे. उर्वरित सर्व महाराष्ट्रातदेखील मान्सून व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आजपासून राज्यातील शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली असून, यावर्षी एक महिना मान्सून उशीरा राज्यात दाखल झाला.

मान्सून राजधानी दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी पोहोचला आहे. साधारणपणे मान्सून मुंबईत लवकर पोहोचतो, मात्र यंदा अरबी समुद्रात मान्सूनचे वारे कमकुवत झाल्यामुळे मान्सून दिल्ली आणि मुंबईत जवळपास एकाच वेळी पोहोचला. कालपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसेच, राज्यासह विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला. कालपासून मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुगुर्ग यासह विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील गोवंडी परिसरात दोन जण नाल्यात वाहून गेले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतही अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या आणि शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. चेंबूर परिसरात ८० मिमी पाऊस झाला. तर विक्रोळीत ७९ मिमी, सायन ६१ मिमी, घाटकोपर ६१ मिमी, माटुंगा ६१ मिमी पाऊस झाला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!