– २५ तारखेपासून पावसाच्या शक्यतेने थोडे आनंदाचे वातावरण!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहात आहेत. शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी पाऊस झाला तर लगेचच पेरण्या उरकण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, २५ तारखेपासून पाऊस सांगतला असल्याने शेतकर्यात थोडे उत्साहाचे वातावरण आहे.
जून उजाडला की शेतकर्यांना वेध लागतात ते पाऊस अन् पेरणीचे. त्यासाठी मोठा आटापिटा करून वेळप्रसंगी कर्जबाजारी होवून शेतकरी पेरणीची तयारी करून ठेवतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने तो पोखरला. तरीदेखील आता पहिल्या दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्यांना लागून आहे. सर्व तालुक्यात शेतकर्यांनी शेतीच्या मशागती पूर्ण केल्या असून, शेतकरी मात्र मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे. तथापि, पाऊस वेळेवर न आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. हवामान खाते व विविध भाकितांनी यावर्षीही पावसाचे वेळेत आगमन होईल व सरासरी इतका पाऊस होईल, असे सांगितले होते. परंतु त्यांचे हे भाकीत आता फोल पडताना दिसत आहे. मे महिन्यात मान्सूनपूर्व सरींचे आगमन होऊन पाऊस पडण्यासाठी वातावरण निर्मिती होत असते. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून, मे महिन्यात अतिउष्णतेचा सामना सर्वांना करावा लागला आहे. जून महिन्यातही उन्हाची तीव्रता तशीच आहे. अधून-मधून ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा व रात्री थंडगार हवा, असे निसर्गाचे विचित्र रूप पाहण्यास मिळत आहे.
मान्सूनला झालेला विलंब हा शेतकर्यांच्या चिंता वाढविताना दिसून येत आहे. सर्व शेतकर्यांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या शेतीची मशागत पूर्ण केली, परंतु मान्सूनचा पाऊस त्यांना वाट पाहण्यास भाग पाडत आहे. मान्सून पाऊस पडणार तरी कधी, असा प्रश्न शेतकर्याला पडला आहे. दरम्यान, हवामान खाते, पंजाबराव डख व इतरांनी २५ तारखेपासून पाऊस सांगितला असल्याने शेतकरी थोडा उत्साहात आला असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
———-