– साईडपट्ट्यांअभावी दर्जान्नोती झालेला रस्ता बनला धोकादायक!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – दर्जोन्नती झालेल्या अंत्री देशमुख रस्त्याच्या साईडपट्ट्याच ठेकेदाराने भरलेल्या नाहीत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून, दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत. तेव्हा या रस्त्याच्या साईडपट्ट्या आठ दिवसांच्याआत भरण्यात याव्यात, अन्यथा युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा सेनेचे शहर प्रमुख ऋषिकेश जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मेहकर उपविभागीय अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद आहे, की मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राज्यमार्ग २१४ ते अंत्री देशमुख या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण असे एकूण जवळपास १५ किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. पैकी ७.६ किलोमीटर काँक्रिट रस्ता हा बसस्टँड ते वडारवाडा, गोसाविपुरा, रामनगर या भागातून जातो. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन बरेच महिने झाल्यावरही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भराव (साईडपट्ट्या) अजून भरण्यात आलेल्या नाहीत. रस्त्यांची उंची साधारण जमिनीपासून दीड ते दोन फूट असल्याने कडेला राहणार्या नागरिकांना रस्त्यावरचे पावसाचे पाणी घरात जाऊन नेहमी त्रास होतो. तसेच वाहन सरळ रस्त्याचे खाली जाऊन आजपर्यंत बरेच अपघातही झालेले आहेत. रस्त्याच्या कडेला राहणार्या वृद्ध, महिला, लहान मुलांना यामुळे कायम त्रास सहन करावा लागतो. तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या साईपट्ट्या पावसाळा सुरू होण्याआधी भरण्यात याव्यात, तशा सूचना आपण तत्काळ संबधित कर्मचार्यांना द्याव्यात. आठ दिवसाच्याआत या साईडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत तर मात्र युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
हे निवेदन देतेप्रसंगी ऋषिकेश जगताप युवासेना शहर प्रमुख, पवन आसाबे, महेश चौधरी, रोहन जाधव, संतोष ठोकरे, किरण चोहरे, गणेश सुरडकर, अभी सावळे, निखिल खनपटे, ओम नरवाडे, अक्षय पुरी, कृष्णा वैध, पवन गोडवे, सुमित कुकडे, हर्षल देशमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
————