प्रताप, तुझी किंमत ‘यांना’ कळत नसेल तर ‘आष्टी-पाटोदा’तून तुला आमदार करते!
– अॅड. प्रतापकाका ढाकणे यांना यंदा तरी आमदार करण्याचे जाहीर आवाहन
– ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी बडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात
शेवगाव/पाथर्डी (बाळासाहेब खेडकर) – पाथर्डी तालुक्याला ढाकणे कुटुंबाच्या योगदानाची जाणीव राहिली की नाही? ज्यांच्या नावावर तुम्ही इकडे बकाबका डोळे झाकून मते देता (पंकजा मुंडे) त्याच्यावर त्यांच्याच पक्षात वाईट वेळ आली, तर त्यांच्या मागे एक तरी आमदार समर्थनासाठी पुढे आला नाही. तुम्हाला तुमच्या चुका सुधारता येत नसतील तर आता तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. प्रताप, तुझ्या तालुक्याला तुझी किंमत जनतेला कळणार नसेल तर चल, तयारी कर, आष्टी-पाटोदा मतदारसंघातून तुला आमदार करून दाखवते, अशा रोखठोक शब्दात ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. सुशीला मोराळे यांनी भाष्य करत, राजकीय तोफ डागली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी बडे यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड .प्रताप ढाकणे, व्यापारी महासंघाचे कांतीलाल गुगळे, भाजपचे अमोल गर्जे, अॅड. प्रतीक खेडकर, हाजी हुमायून आतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बोरुडे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, डॉ. दीपक देशमुख, आदी प्रमुखांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रा. मोराळे मराठवाड्यातील डाव्या विचारसरणीचे प्रमुख नेतृत्व म्हणून चर्चेत आहेत. तालुक्याच्या राजकीय जीवनात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांचा प्रभाव राहून त्यामुळेच दोन वेळा अॅड. प्रताप ढाकणे यांना पराभव पत्करावा लागला. ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांची राजकीय परिस्थिती पाहता, पुढचे राजकीय चिन्ह कसे राहील, याचा विचार करण्याचे सूचवत त्यांनी झालेल्या चुका भविष्यात सुधारण्याचे आवाहन एका बाजूने केले तर दुसर्या बाजूने मुंडे घराण्याचा राजकीय प्रभाव संपत चालल्याकडे लोकांचे लक्ष वेधले. प्राध्यापक मोराळे यांनी अत्यंत मुत्सद्दीपणाने भाषण करत मुंडे यांचा तालुक्यावरील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्नही केला. त्या म्हणाल्या, की प्रताप ढाकणे यांच्या काय चुका आहेत, कोणाची शिक्षा तुम्ही त्यांना देता, किती दिवस रडू गाणे गात राहणार, अशा नेतृत्वाची फक्त मतदारसंघालाच नाही तर राज्याला गरज आहे. आता चुकला तर काळ पुन्हा चूक सुधारण्याची संधीसुद्धा देणार नाही. बीड जिल्ह्यात काय आणि इकडे काय, कोणाला आणायचे आणि कोणाला पाडायचे एवढी आमची ताकद आहे. ती दाखवून देऊ. प्रताप, तुला आता कोणी रोखू शकत नाही. बबनरावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा, असे आव्हानदेखील प्रा. मोराळे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव तुपे, सूत्रसंचालन गणेश सरोदे व अपर्णा शेळगावकर यांनी तर आभार दीपक बडे यांनी मानले.
शिक्षणाच्या बाजारीकरणाला वेळीच विरोध करा – प्रा. मोराळे
नव्या शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी गांभीर्याने अभ्यास करा. शिक्षणाचे बाजारीकरण होऊन आता पैशाशिवाय शिक्षण नाही. संघाच्या मुशीत तयार झालेल्या ३५० कार्यकर्त्यांना शासनाने कलेक्टर केले. हायस्कूल म्हणजे लिमिटेड कंपनी, शिक्षक म्हणजे विक्रेता, विद्यार्थी हा ग्राहक तर पदव्या म्हणजे प्रॉडक्ट ठरवले जाणार आहे. राज्यात २० हजार शाळा केव्हाही बंद होऊ शकतात. दहा शाळांची मिळून एक शाळा होणार असून, सर्वांनी अशा या धोरणाला विरोध करावा, असे आवाहनदेखील ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. सुशीला मोराळे यांनी केले. यावेळी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्यासह सर्वच वत्तäयांनी शिवाजी बडे यांच्या प्रामाणिक, कष्टाळू व निष्ठावान सेवेचे कौतुक भाषणातून केले.
——-