शेगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीसाठीच्या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल २१ जूनरोजी जाहीर झाला असून, जिल्ह्यातून ८० विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत. यंदा जिल्ह्याचा निकाल चांगला लागला आहे. गोरगरीब, परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्यावतीने मोफत व दर्जेदार निवासी शिक्षण या विद्यालयातून दिले जाते.
केंद्र शासनाच्यावतीने गरीब तसेच हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात निवासी स्वरूपात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी या संस्थेचे अध्यक्ष असतात. या माध्यमातून सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत मोफत व तितकेच दर्जेदार शिक्षण देण्यात येते. त्यामुळे सहाजिकच विद्यार्थी व पालकांचा ओढा इकडे जास्त असतो. येथील प्रवेशासाठी प्रथम पात्रता परीक्षा घेण्यात येते. यासाठी २९ एप्रिल रोजी इयत्ता सहावीसाठीची प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील ३७ परीक्षा केंद्रावरून १० हजार २५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी मात्र १० हजार ९८७ विद्यार्थ्यांनी केली होती. सदर परीक्षेचा निकाल २१ जूनरोजी जाहीर झाला आहे. यासाठी जिल्ह्यातून ८० विद्यार्थी शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय शेगाव चे प्राचार्य आर. आर. कसर, उपप्राचार्य देशमुख व शिक्षकवृंदांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त विद्यार्थी पात्रता परीक्षेला बसावे, यासाठीदेखील प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षक वृंदांनी चांगलीच मेहनत घेतली होती. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची प्रवेशासाठीची प्रक्रिया जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे सुरू झाली आहे.