– दरोड्याच्या निषेधार्थ शेवगाव कडकडीत बंद!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय ५५ वर्ष) यांच्या राहत्या घरावर आज २३ जूनला भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून बलदवा यांच्यासह त्यांच्या भावजयीचा निर्घृण खून केला तर एकजण गंभीर जखमी झालेला आहे. घरातील लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केलेला आहे. या घटनेने शेवगाव हादरले असून, व्यापारीवर्गासह ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून आपला निषेध व्यक्त केला.
प्रसिद्ध व्यापारी गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलवा (वय ६५ वर्ष) या दोघांचा या दरोड्यामध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान मृत्यू झाला, तर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनिता बलदवा या गंभीर जखमी झालेल्या आहेत. सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला होता. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ही बंदची हाक दिली होती, त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेवगाव पोलिसांच्या निष्क्रियतेचा शेवगावकरांनी तीव्र निषेध करत, या दरोड्याचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली.
या घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली, तसेच घटनास्थळी व्यापार्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी व्यापार्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेत या घटनेचा निषेध केला. ‘शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा,’ शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची दोन दिवसापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने कक्ष विभागात बदली केली होती. परंतु, झालेली ही बदली तातडीने रद्द करण्यासाठी भाजपच्या लोकप्रतिनिधी व काही पदाधिकार्यांनी मुंबई दरबारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वजन वापरल्याची जोरदार चर्चा शेवगाव शहरात आहे. ही बदली रद्द होताच शेवगाव शहरात फटाकेही फोडण्यात आले होते. परंतु, आता शहरात दरोड्याच्या घटना घडत असताना, आणि त्यात शांतताप्रिय समाजाच्या दोघांचा बळी जात असताना शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
असा घातला दरोडा….
अज्ञात तीन ते चार सशस्त्र दरोडेखोरांनी प्रथम गौरव बदलवा यांच्या घराला बाहेरुन कडी लावली व नंतर वेगळ्या मार्गाने गोपीकिशन बदलवा यांच्या घरात प्रवेश करुन झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर गजाने प्रहार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चोरी करताना पुष्पा बदलवा जाग्या झाल्याने त्यांनाही जीवे मारले. या घटनेत तीन चोरटे दुचाकी वाहनावरुन आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकात रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
—–