मेहकर (अनिल मंजुळकर) – कोराडी धरणात बोटीतून उडी घेऊन ‘स्टंटबाजी’ करताना पाण्यात बुडालेल्या रोशन मुराजी इंगळे (वय २२) या तरुणाचा अखेर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास, हा तरुण जेथे बुडाला होता त्याच पाणी परिसरात मृतदेह आढळला. बुलढाणा येथून कोराडी धरणात दाखल झालेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या शोधमोहिमेदरम्यान गळाला लागून हा मृतदेह वर आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मेहकर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर ताे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळच्या सुमारास भानखेड, ता. चिखली येथील राेशनच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
काल दुपारी कोराडी जलाशयातून विवेकानंद आश्रमाच्या बोटीने विवेकानंद स्मारकाकडे जात असताना, रोशन इंगळे (रा. भानखेड, ता. चिखली) व त्याच्या मित्राने धरणात उड्या घेतल्या होत्या. रोशनच्या मित्राला वाचविण्यात यश आले होते, तर रोशन हा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला होता. काल दुपारपासून त्याचा पाण्यात शोध घेण्यात आला. परंतु, तो सापडला नव्हता. रात्रीच्यावेळी शोधमोहिम थांबविण्यात आली होती. आज सकाळी साखरखेर्डा पोलिस व बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संभाजी पवार व त्यांचे सहकारी तारासिंग पवार, गुलाबसिंह राजपूत, संदीप पाटील, इशान पटेल, समाधान देशमाने, समाधान साबळे, कृष्णा जाधव, वैभव जाधव, तलाठी रहाटे यांच्यासह विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते व कर्मचार्यांनी धरणात शोधमोहिम सुरू केली. पाण्यात गळ सोडून शोध घेतला जात असताना, रोशन इंगळे या तरुणाचा मृतदेह गळाला लागून वर आला. रोशन हा जेथे बुडाला होता, तेथेच हा मृतदेह हाती लागला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला होता. उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भानखेड, ता. चिखली या राेशनच्येया मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
दरम्यान, विवेकानंद आश्रम परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, काही अज्ञात तरुणांचे टोळके हिवरा आश्रम परिसरात फिरत असल्याने पोलिसांनी ही दक्षता घेतली आहे. दरम्यान, या दुर्देवी घटनेने विवेकानंद आश्रमाचे मातृहृदयी अध्यक्ष पूज्यनीय आर. बी. मालपाणी हे प्रचंड हळहळले असून, काल रात्री त्यांनी अखंड उपवास धरला. पाण्याचा थेंबदेखील त्यांनी प्राशन केला नव्हता. तसेच, असे दुर्देवी अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आदेश त्यांनी विवेकानंद आश्रम व्यवस्थापनाला दिले आहेत.
भानखेड गावावर शोककळा
चिखली तालुक्यातील भानखेड येथे गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्युसदृश आजाराने थैमान घातलेले आहे. या आजाराने आजपर्यंत तीनजण दगावलेले असून, त्यात एका विवाहितेचादेखील समावेश आहे. त्यातच काल कोराडी धरणात उडी घेऊन बुडालेला रोशन इंगळे याचादेखील दुर्देवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
———-