सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्या रिक्त जागेवर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. संतोष नवले यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपल्या पदाचा पदभार गुरुवारी स्वीकारला. डॉ. नवले हे येथे येण्यापूर्वी धुळे येथे कार्यरत होते. विशेष म्हणजे, सध्या पंढरपूरच्या वारीनिमित्त सर्व आरोग्य यंत्रणा वारीमध्ये असल्यामुळे डॉ. नवले हेदेखील आल्या आल्या वारीमध्ये गेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. नवले यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश मागील दोन दिवसापूर्वी पडला होता. मात्र डॉ. नवले यांनी पदभार अद्याप घेतला नव्हता. परंतु गुरुवारी नवले यांनी हा पदभार स्वीकारला असल्याचा आदेश निघाला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागातर्पेâ राबविण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर डॉ. नवले यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले व त्यांची नियुक्ती गडचिरोलीला झाली होती. डॉ. जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेतली. त्यामुळे त्यांचे निलंबन काळातील मुख्यालय पुन्हा सोलापूर करण्यात आले. त्यानंतर मॅटमध्ये या प्रकरणावर सुनावणी होऊन डॉ. जाधव यांचे निलंबन रद्द करण्यात आले.
आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता पदभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्याकडे देण्यात आला होता. अशात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबीर राबविण्याचे नियोजन केले. पण हे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाला पेलवेल की नाही, असे गृहित धरून धुळ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांच्याकडे सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी पुढील आदेश होईपर्यंत देण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु गुरुवारी पदभार स्वीकारला असल्याचे आदेशच निघाला आहे. डॉ. नवले यांनी यापूर्वी महापालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून काम केले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी पदभार स्वीकारले असून ते माहितीस्तव संचालक, सहाय्यक व संचालक यांना पाठविण्यात आले आहे.