स्टंटबाजी जीवावर बेतली! कोराडी धरणात युवक बुडाला; एकाला वाचविण्यात यश!
– लाईफ जॅकेट घालण्यास केला होता विरोध; रात्री उशिरा सर्चमोहीम थांबविली!
मेहकर (अनिल मंजुळकर) – विवेकानंद आश्रमाने विकसीत केलेल्या कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकाचे पर्यटन करण्यासाठी गेलेल्या हुल्लडबाज तरुणांच्या स्टंटबाजीमुळे एक युवक धरणाच्या पाण्यात बुडाला असून, रात्री उशिरापर्यंत राबविलेल्या सर्चमोहिमेत त्यांचा मृतदेह हाती लागू शकला नाही. तर एका युवकाला वाचविण्यात नावाड्याला यश आले आहे. बोटीतील नावाड्याने केलेल्या सूचनांचे पालन न करणे, आणि लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिल्यानेच या स्टंटबाज युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर असे, की विवेकानंद आश्रमाने कोराडी जलाशयात विवेकानंद स्मारक हे पर्यटन व अध्यात्मिक केंद्र निर्माण केले असून, या पर्यटन केंद्राला दररोज शेकडो पर्यटक भेट देत असतात. या केंद्रावर जाण्यासाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने बोटिंगची सोय करण्यात आली आहे. तसेच, या बोटीत सुरक्षित असे लाईफ जॅकेटदेखील पुरवण्यात आलेले आहेत. आज (दि.२२) रोजी दुपारी दोन वाजता चिखली तालुक्यातील भानखेड येथील लक्ष्मण गजानन इंगळे (वय २२), आदेश किशोर इंगळे (वय २१), ऋतिक भारत सोनुने (वय २३), अनिकेत गणेश सुरडकर (वय २४) व रोशन मुरारी इंगळे (वय २०) हे तरुण बसले होते. हे तरुण हुल्लडबाजी करत असल्याने सुरुवातीला बोटीचा चालक संदीप खराटे याने त्यांना बोटीत घेण्यास नकार दिला होता. परंतु, आम्ही मुली व महिलांना पाहून हुल्लडबाजी करणार नाही, असे या मुलांनी सांगितल्याने नावाडी खराटे याने त्यांना बोटीत घेतले. बोट विवेकानंद स्मारकाकडून हिवरा आश्रमकडे येत असताना, यातील रोशन मुरारी इंगळे (वय २०) व आदेश किशोर इंगळे (वय २१) या दोन तरुणांनी नावाडी खराटे याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून, तसेच बोटीतील महिला व मुलींसमोर हिरोगिरी करण्याच्या नादात कोराडी धरणात उड्या मारल्या. या तरुणांच्या उड्यानंतर बोटीतील प्रवासी घाबरल्याने बोट हेलकावे खात असल्याचे पाहून नावाडी खराटे याने तातडीने ही बोट किनार्यावर आणली, तर दुसरे नावाडी गुलाब कांबळे हे तातडीने आपली बोट घेऊन पाण्यात उड्या मारलेल्या मुलांच्या दिशेने धावले. त्यातील आदेश इंगळे या युवकाला वाचविण्यात कांबळे या नावाड्याला यश आले, तर रोशन इंगळे हा पाण्यात दिसेनासा झाल्याने त्यांना प्रचंड शोधाशोध करूनही त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. मुली-महिलांसमोर स्टंटबाजी व हिरोगिरी करण्याच्या नादात हा युवक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. परंतु, तो मिळून आला नाही. त्यामुळे शोधमोहिम थांबविली होती. या घटनेने हिवरा आश्रम परिसरासह भानखेड गावात एकच हळहळ व्यक्त केली जात होती. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसदेखील सर्चऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू केली जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
लाईफ जॅकेट घातले असते तर वाचला असता!
कोराडी जलाशयात विवेकानंद आश्रमासह खासगी नावाडी गुलाब कांबळे यांच्यावतीने बोटिंग सेवा दिली जाते. प्रवाशांसाठी बोटीमध्ये लाईफ जॅकेट देण्यात आलेले आहेत. भानखेडचे पाचही मुले बोटीत हुल्लडबाजी व स्टंट करत होते. त्यांनी लाईफ जॅकेट घालण्यासही नकार दिला. तसेच, नावाडी संदीप खराटे याच्या सूचनांचेही पालन केले नाही. महिला व मुलींना पाहून स्टंटबाजी करण्याच्या नादात दोन युवकांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यावेळेस नाव विवेकानंद स्मारकापासून ५० फूट अंतरावर खोल पाण्यात होती. आदेश इंगळे हा केवळ नावाडी गुलाब कांबळे यांच्या सतर्कतेमुळे वाचू शकला तर रोशन इंगळे या युवक मात्र पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. या युवकाने लाईफ जॅकेट घातले असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते.
————-