विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा; अजितदादांची पक्षाकडे मागणी!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, आणि पक्ष संघटनेत कोणतेही महत्वाचे पद द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पक्षाच्या रौप्यमहोत्सवी मेळाव्यात मुंबईत केली. दादांच्या या मागणीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदारांच्या आग्रहाखातर विरोधी पक्षनेता झालो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मागील पाच वर्षे एका महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी तीन वर्षांनंतर पद बदलण्याची पक्षाचा घटनेत तरतूद आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे पक्षातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
https://www.facebook.com/watch/?v=985096559177189
राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्यमहोत्सवी मेळावा आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करा, आपल्याला पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कुठलीही जबाबदारी द्या, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे कडक शब्दांत कान टोचले. तसेच त्यांनी भाकरी बदलायला हवी, असे मत मांडले. एकाच सेलमध्ये तेच-तेच माणसे असण्यापेक्षा भाकरी फिरवली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाच्या हातात एकहाती सत्ता का नाही? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित करत, इतर नेत्यांपेक्षा शरद पवार उजवे आहेत. तरी पण कमी का पडलो? मुंबईत सर्वात कमी आपण आहोत. मुंबईत अद्याप अध्यक्ष नाही. मुंबईत पक्ष का वाढला नाही? याचादेखील विचार केला पाहिजे, असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी गेल्या ५ वर्षे १ महिन्यांपासून सांभाळत असल्याचे सांगून, विरोधी पक्षनेतेपद सोडण्यापेक्षा सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे, असा सल्ला देत अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या टोला मारला.
“अजित दादा तुमच्याकडे आता कुणी काम घेऊन आलं तर त्याला तू कोणत्या बुथ कमिटीत काम करतो ते सांग, असं म्हणायचं. तुझी बुथ कमिटी कुठली, तुझं गाव कुठलं? एवढं लिहून घ्यायला सुरुवात करा. सगळे बुथ कमिट्या करायला लागतील. बुथ कमिट्या केल्याशिवाय स्वस्थ बसायचा नाही, हा संदेश घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र हे शांतता प्रिय राज्य असूनही सातत्याने दंगली होत आहेत. जिथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही, तिथे केले जाणीवपूर्वक दंगली निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप या मेळाव्यातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. देशात आज शेतकरी अस्वस्थ असून दुखावलेला आहे. कांदा, कापूस आणि सोयबीनसारख्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.