– राजपूत भामटा जातीचा ‘भामटा’ शब्द न हटविण्याचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – विमुक्त जातींच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मूळ जातीचे बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विविध शासकीय नोकर्या व शैक्षणिक जागेवर अतिक्रमण करुन संपूर्ण विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय सुरु केला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गोरसेना संघटना आक्रमक झाली असून, या संघटनेच्यावतीने स्थानिक त्रिशरण चौकात १९ जूनरोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
विमुक्त जातीच्या संवर्गात राजपूत भामटा ही एक जमात असून, बिगर मागास राजपूत जातीतील लोक भामटा हा शब्द जातीपुढे लावून खर्या राजपूत भामटाचे शैक्षणिक व नोकर्यात नुकसान करत आहे. यासंदर्भात गोरसेनेने २२ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन केले होते. त्यानंतर ११ मे २०२२ रोजी याच मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चासुध्दा काढला होता, तरीही राजपूत भामटा या जातीच्या नावाने बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी शासकीय नोकर्या व शैक्षणिक ठिकाणी घुसखोरी सुरुच ठेवली आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरवर्षी राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन हजारो जागा एमबीबीएस.,एमडी., बीएएमएस., इंजिनीअरींग प्रवेशामध्ये बिगर मागासांनी लुटलेल्या आहेत. असे असतांना शिंदे-फडणवीस सरकारने भामटा हा शब्दच काढण्यासाठी हालचाली सुरु केल्याने भविष्यात राजपूत भामटा व विमुक्त जातीचे आरक्षण पूर्णतः धोक्यात येणार आहे. म्हणून शासनाने सदर शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवू नये, बिगर मागास नामसाधर्म्य असलेल्या जातींनी गैरफायदा घेवू नये, यासाठी बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, व असे बोगस प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्रे देणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावे, जातवैधता पडताळणी समितीवर गोर बंजारा समाजाचे विमुक्त जातीचे प्रतिनिधी घ्यावे, १९३१ ज्या जनगणनेप्रमाणे १९६१ च्या थाड़े कमिशनच्या शिफारशीनुसार ज्या गावात वि.जा.अ. प्रवर्गातील मूळ राजपुत भामटा वास्तव्याला होता, त्या गावाच्या नावाची जातीनिहाय यादी दरवर्षी प्रदर्शित करण्यात यावी, राजपूत भामटामधील भामटा शब्द वगळू नये आदि मागण्यांसाठी गोरसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडले. भटक्या विमुक्त जातीच्या हजारो लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोर सेनेचे विभागीय अध्यक्ष सोनुभाऊ चव्हाण यांनी केले होते. भविष्यात आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास येणार्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रा. संदेश चव्हाण यांनी दिला आहे.