आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना शाळा मिळाल्या; आता ‘ऑर्डर’साठी ‘हॅरेशमेंट’!
सोलापूर (संदीप येरवडे) – आंतर जिल्हा बदली झालेल्या ९२ शिक्षकांना शाळा मिळाल्यात. परंतु ऑर्डर मिळविण्यासाठी बुधवारी दिवसभर ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना शाळा देण्यासाठी दीड महिना लावले आणि आता ऑर्डर देण्यासाठीदेखील त्रास सहन करावा लागत असल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री अकरा वाजता शाळा दिलेल्याची यादी लावली. त्यानंतर बुधवारी शिक्षकांनी ऑर्डर मिळेल, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामध्ये दिवसभर थांबावे लागले. विशेष म्हणजे, मस्टरवरती सही करण्यासाठीदेखील रात्री सहा वाजता मस्टर शिक्षकांच्या ताब्यात दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक बरेच हे परजिल्ह्यातून आलेले आहेत. या शिक्षकांना परत जायचे यायचे वांदे झाल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात होते.
बरेच शिक्षक हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. या शिक्षकांना सोलापूर जिल्ह्यामध्ये आले असताना परजिल्ह्यातून आपले गबाळ आणण्यासाठी तारांबळ होणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात जरी पाऊस नसला तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पाऊस लागून बसल्यानंतर गाळ आणताना खूप अडचणी येऊ शकतात. याचा विचार केला असता ऑर्डर देण्यासाठी शिक्षण विभागांमधून जाणून-बुजून विलंब लावला जात आहे.
आंतरजिल्हा बदली झालेल्या ९२ शिक्षकांच्या ऑर्डर तयार आहेत. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंढरपूरच्या वारीमध्ये असल्यामुळे त्यांच्या सहीमुळे थांबले आहे.
– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
———–