सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पंढरपूरचा विकास आराखडा स्थानिक लोकांना विचारात घेऊनच केला जाणार आहे. पायाभूत सुविधा असतील किंवा येथील भक्त निवास असेल, ही सर्व कामे करताना स्थानिक लोकांसह लोकप्रतिनिधी व आलेल्या सूचना विचारात घेऊनच करण्यात येणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले.
उपसभापती गोर्हे या मंगळवारी सोलापूर दौर्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तसेच पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखडा आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाचा ही आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. उपसभापती गोर्हे म्हणाल्या, पंढरपूर देवस्थानसाठी ७६ कोटी रुपये शासनाने मंजूर केल्याने विकास आराखडा तयार करता येणार आहे. हा विकास आराखडा तयार करताना लोकाभिमुख कामे केली पाहिजे. कोणताही निर्णय लागला जाऊ नये. त्यासाठी हा विकास आराखडा सोशल मीडियावर टाकले पाहिजे. लोकप्रतिनिधी यांनादेखील विश्वासात घेऊन हा विकास आराखडा तयार करावा. याबरोबरच पंढरपूरला विमानसेवा सुरू करावी, असा प्रस्तावदेखील पाठवण्यास सांगितले आहे. कारण पंढरपूरला पायी चालत जाणार्या वारकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे देशासह परदेशातील नागरिकदेखील पंढरपूरला विमानाने दर्शन घेऊन जाता येऊ शकते. सोलापुरात जरी विमानसेवा असली तरी पंढरपुरातदेखील विमानसेवा सुरू झाली तर सर्वांना दर्शन घेण्यासाठी सोयीचे होऊ शकणार असल्याचेही याप्रसंगी गोर्हे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड, सीमा पाटील, सुनिता मोरे, संजना घाडी, पूजा खंदारे आदी महिला उपस्थित होत्या.
बोगस कामाचा अहवाल मागितला
यापूर्वी पंढरपूरमध्ये जे काही विकासकामे झाली, त्यामध्ये बोगस कामे कोण-कोणत्या प्रकारचे झाले आहेत. त्याबाबत अहवाल मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सांगितले.
अन्न पदार्थ आणि कुंकवाच्या भेसळीवर विशेष लक्ष!
पंढरपूरच्या वारीत अन्नपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ करुन विक्री करण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपुरात महिला वर्गाकडून कुंकवाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र केमिकलच्या भेसळीमुळे अलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रशासनाने भेसळीकडे लक्ष देण्याच्या सूचना ही यावेळी उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिल्या आहेत.
———-