– स्वतःला वाचविण्यासाठी अधिकार्यांकडून माजी सैनिक शेतकरी वेठीस?
मेहकर (अनिल मंजुळकर) – घाटबोरी वनपरिक्षेत्र हा सध्या अवैध वृक्षतोडसाठी गाजत आहे. येथील जंगलात विनापरवाना मूकसंमतीने वृक्षतोड झाली. याबात अनेक तक्रारी वनविभागात प्राप्त झाल्या असून, त्या अनुषंगाने चौकशीसाठी डीएफओ आले, त्यानंतर अमरावती येथून पथक येऊन त्यांनी पाहणी केली. या पाहणीत मोठ्या प्रमाणात सागवानतोड केल्याचे दिसून आल्याने आता वन विभाग आपले पितळ झाकून ठेवण्यासाठी शेतकर्यांना नोटिस धाडून त्यांची चौकशी करीत असल्याचे दिसून येत आहे. माजी सैनिक शेतकर्याला नोटिस बजावून चौकशीला हजर रहा, सोबत येताना वृक्षतोडीची परवानगी किंवा कागदपत्रे घेऊन या, अन्यथा कारवाई करू, असा इशारा या नोटिसद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे ही चौकशीची नोटीस आहे की धमकी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
घाटबोरी वन परिक्षेत्रात रेतीचोरी, सागवान लाकूडतोड असे अनेक प्रकार चालतात. त्यावर १२ जूनरोजी डीएफओ यांनी पाहणी करून कारवाईचे संकेत दिलेत. त्यानंतर अमरावती येथील वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी केली. त्यात आपले पितळ उघडे पडेल या भीतीने स्थानिक अधिकार्यांनी जुळवाजुळव करून सागवान जप्त करण्याची सुरवात केली. त्यातील एक केविलवाणा प्रकार समोर येत आहे. मेहकर तालुक्यातील ग्राम कळमेश्वर येथील माजी सैनिक विश्वनाथ गोविंदराव इंगळे (वय ७३) या शेतकर्याला १९७६ मध्ये २ हेक्टर ४३ आर शासकीय जामीन घाटबोरी शेतशिवारात मिळाली होती. त्या शेतीमध्ये सागवान वृक्ष असल्याने संबंधित शेतकर्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी कित्येकवेळा सागवान तोडण्याची परवानगी मागितली. मात्र त्यांना सांगण्यात आले की तहसीलदार, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्या परवानग्या आणा, तरच झाडे तोडता येतील. हे सर्व कागदीसोपस्कार त्यांना हे झेपवणारे नसल्याने त्यांनी त्याचा पिच्छा सोडला. मात्र १७ जूनरोजी त्यांच्या घरी वनविभागाने नोटिस देऊन त्यांना १९ जूनरोजी घाटबोरी येथे बोलावले. आता शेतकर्याचे म्हणणे आहे की, आम्ही शेतातील सागवान वृक्षाकडे कधी बघितलेच नाही. अश्यात नोटीस मिळाल्यावर आम्हाला माहिती मिळाली की, आमच्या शेतीमधील सागवान वृक्ष तोडल्या गेली. एका ठेकेदाराने १७० झाडाची परवानगी घेतली अन् बाकी शेजारच्या माजी सैनिकांच्या शेतामधलीदेखील झाडे तोडण्यात आली.
प्रकरण हाताबाहेर गेल्याने संबंधित शेतकर्यांना नोटीसद्वारे कळविल्याने माजी सैनिकांना आश्चर्यकारक धक्का बसला आहे. त्या ठेकेदारांशी हातमिळवणी करून वनपरिक्षेत्र अधिकारी स्वतः ला वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे वनविभागात बोलले जात आहे. सदर शेतकर्यांला दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले की, उपवन संरक्षक बुलढाणा हे १२ जूनरोजी घाटबोरी वर्तुळात दौर्यावर असतांना वनखंड क्रमांक १७८ ला लागून असलेल्या तुमच्या शेतात सागवान वृक्ष तोडलेले दिसलें, तर काही झाडाच्या बुडावर लाकडे दिसून आली तर काही झाडाच्या बुडाजवळ लाकडे दिसून आली नाही. या नोटीसवरून आता या माजी सैनिक शेतकर्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पीडित शेतकर्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी १९ जूनरोजी शेतकर्यास चौकशीसाठी बोलावण्यात आले असता, त्यांनी शेतकर्यास फक्त तुम्ही कबूल करा की तुम्ही अनावधानाने वृक्षतोड केली. आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. शेतकरी मात्र ठाम राहिले, त्यांनी सांगितले की आम्ही झाडे तोडलीच नाही. जेव्हा नोटीस मिळाली तेव्हाच कळाले की आमच्या शेतातील झाडे तोडल्या गेलीत. यावरून स्थानिक वनअधिकारी या प्रकरणात कातडीबचाव करत असल्याचा संशय निर्माण झालेला आहे.
————