सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय वस्त्यांचे गुगल मॅपिंग करुनच कामे सुरू करा. यासाठी जिल्हा परिषदेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने अॅप तयार केले आहे. त्याव्दारे ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता यांना वस्त्यांचे गुगल मॅपिंग करण्याची जबाबदारी पार पाडण्याविषयीच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी कार्यशाळेमध्ये दिल्या.
सन २०२३-२४ मध्ये जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेंतर्गत सन २०२३-२४ ते २०२७-२८ पंचवार्षिक आराखडा तयार करण्याकरीता बुधवारी जिल्हयातील सर्व सहाय्य्क गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती व ब्लॉक मॅनेजर यांची कार्यशाळा समाजकल्याण विभागाकडून शिवरत्न सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. वस्त्यांचे गुगल मॅपिंग मुळे वस्त्यांमध्ये होणार्या कामांविषयी पारदर्शकता येणार आहे. आवश्यक त्याच ठिकाणी कामे झाल्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी होणार असल्याबाबत समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी सांगितले.
तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन आवश्यक असणार्या सोयी सुविधा व त्यांना देण्यात येणारे लाभ याविषयी सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांगांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच वृदध व्यकतींना करमणूक केंद्र गावामध्ये तयार करण्यात येणार असून वृदध व्यकतींना देण्यात येणा-या सोयी सुविधा व इतर अनुषांगिक माहिती संकलित करण्यासाठी सुचित करण्यात आले.