– वनरक्षक निलंबीत, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकार्यांवर कारवाईची टांगती तलवार!
– मालकीहक्कातील झाडे तोडून शेतात ठेवल्याने शेतमालकही अडचणीत
मेहकर (अनिल मंजुळकर) – घाटबोरी वनक्षेत्रातील धक्कादायक प्रकार आज (दि.१५) अमरावती येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह अधिकारीवर्गाने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत उघडकीस आला. मालकीहक्कातील १७० झाडे तोडण्याची परवानगी ठेकेदाराने घेतली. परंतु, प्रत्यक्षात ५००पेक्षा जास्त झाडे तोडली गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात वनरक्षक निलंबीत करण्यात आल्या असून, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकलेली आहे.
सविस्तर असे, की बहुचर्चित ठरणार्या घाटबोरी येथील वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये बर्याच मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची अवैध कत्तल झाल्याच्या तक्रारी वनविभागात प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ अधिकार्यांनी घाटबोरी येथे भेटीदरम्यान वनरक्षक किर्ती खरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. आज अमरावती येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह अधिकारीवर्गाने घाटबोरी वर्तुळात भेट देत, प्रत्यक्ष पाहणी केली. या दौर्याने घाटबोरी वनातील कर्मचार्यांसह अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. आज सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेल्या पाहणीदरम्यान मालकी हक्कातील १७० झाडांची परवानगी वनविभागाने दिली होती. परंतु, ठेकेदाराने तब्बल ५०० च्यावर सागवान झाडे तोडली आहेत, व मालकी हक्कातील झाडे तोडून घाटबोरी भाग एकमधील घाटबोरी भाग २ मध्ये जंगलात टाकल्याने एकच गोंधळ उडाला. तोडलेल्या झाडावर कुठेच वनविभागाचे शिक्के नाहीत. त्यामुळे हा प्रकार धक्कादायक असाच होता. आता कारवाई झालेल्या वनरक्षकासह वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकार्यांवर टांगती तलवार असल्याचे बोलल्या जात आहे. या कारवाई तपासासाठी अमरावतीचे विभागीय वनसंरक्षक करे, वनपरिक्षेत्र अधिकारी भुजाडे, गुज्जर सर्वेअर अमरावती येथील अधिकार्यांसह घाट बोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीलायता, वनपाल उषा जाधव, वनरक्षक लठ्ठाड, वनरक्षक डोईफोडे, वनरक्षक भोंडे आदी हजर होते.
घाटबोरी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची कत्तल होत असून, वनतस्कर चांगलेच फोफावलेले आहेत. याबाबतच्या तक्रारी वनमंत्र्यांकडेदेखील करण्यात आल्या आहेत. या वनात सागवान तस्करांची मोठी टोळीच सक्रीय असून, ठेकेदारांसह काही अधिकारी संशयाच्या भोवर्यात आहेत. अवैध सागवान तस्करीतून दरमहा लाखोंचा मलिदा कोण लाटत आहे? याचा सखोल तपास होण्याची गरज आहे.
—————–