बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – वहिती व अतिक्रमीत जमिनीवर तलाव बांधण्याचा शासनाचा घाट असून, यामुळे आमच्यावर मात्र उपासमारीची वेळ येणार आहे. तरी सदर अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे, यासाठी आज, १३ जूनपासून खामगाव तालुक्यातील घारोड़च्या मागासवर्गीय अतिक्रमण धारकांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत २ जून रोजी उपविभागीय अधिकारी खामगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घारोड़ शिवारातील अतिक्रमीत जमीन १९८३ पासून आमचे पूर्वज व आम्ही वहिती करीत आहोत व त्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे. १४ एप्रिल ९० पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे, असा शासन निर्णयदेखील आहे व तसे दावे आम्ही संबंधिताकड़े दाखल केले आहेत. परंतु अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. उलट या जमिनीवर जलसंधारण विभागाकड़ून तलाव बांधण्यात येणार असून, यासाठी आम्हा मागासवर्गीय लोकांवर दबाव आणल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
तरी अतिक्रमीत जमिनीचे भाड़ेपट्टे देण्यात यावे, तलावासाठी संपादीत जमिनीचा मोबदला व प्रमाणपत्र संबंधीत अतिक्रमण धारकांना देण्यात यावे, या व इतर मागण्यासाठी घारोड़ येथील प्रल्हाद राघो इंगोले, धोंड़ू भगवान इंगळे, सखाराम उदेभान इंगोले, मधुकर भगवान इंगळे, लिलाबाई सदाशिव इंगोले, सुनील सदाशिव इंगोले, रामदास गणपत इंगळे, मिराबाई भिकाजी इंगोले, नारायण पंढरी इंगोले, अजाबराव तुकाराम इंगोले व प्रकाश सदाशिव इंगोले आदिंनी खामगाव एसड़ीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणास आज, १३ जूनपासून सुरूवात केली आहे. दरम्यान, खामगाव बाजार समितीचे उपसभापती संघपाल जाधव यांनी उपोषणास भेट देवून पाठिंबा दिला आहे.