चिखली (महेंद्र हिवाळे) – सिंदखेडराजाचे माजी आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे स्थानिक नेते शशिकांत खेडेकर यांच्या स्कॉर्पिओची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. १० जूनच्या रात्री मेहकर फाटा परिसरात ही घटना घडली. पण, याबाबत दोन दिवसानंतर चिखली पोलिसांत आज तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हा हल्ला वाळूतस्करांनी केल्याचा संशय खेडेकर यांनी व्यक्त केला असून, हल्ला झाला त्यावेळी वाहनात शशिकांत खेडेकर हे नव्हते. तर त्यांचे पुत्र व पत्नी व चालक असे तिघेजण होते, असेही सांगण्यात आले.
श्रीनिवास खेडेकर हे आपल्या आईसह देऊळगावराजाहून बुलढाण्याकडे मेहकर फाटा परिसरातून जात असताना, अज्ञात हल्लेखोरांनी रॉडने त्यांच्या स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच २८, सी ४६९९)वर हल्ला केला. या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्यात. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तेथून काढल्याने आपण व आपल्या आईचा जीव वाचला, असे श्रीनिवास खेडेकर यांनी सांगितले. १० जूनच्या रात्री हा थरारक प्रकार घडल्यानंतर, आज १३ जूनला याबाबत चिखली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपण वारंवार वाळूतस्करांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने हा हल्ला वाळूतस्करांनीच केला असावा, असा संशय माजी आ. शशिकांत खेडेकर यांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने चिखली पोलिस पुढील तपास करत आहेत. तसेच, या घटनेतील वास्तव उघडकीस आणण्याची मोठी जबाबदारी आता चिखली पोलिसांवर येऊन पडली आहे.
————–