सततच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्याला १५०० कोटी रुपयांची मान्यता
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या खरीप हंगामात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने १५०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. १३ जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत केलेल्या जलसमाधी आंदोलाचे हे मोठे फलीत ठरले आहे.
राज्यात सततच्या पावसाने गेल्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचीही नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी सर्व प्रथम रविकांत तुपकर यांनी केली होती व सातत्याने लावूनही धरली होती. बुलढाण्यातील एल्गार मोर्चानंतर तुपकरांनी हजारो शेतकर्यांना घेऊन जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईत धडक दिली होती. सदर आंदोलनावेळी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई देवू व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करू, असा शब्द दिला होता. वेळप्रसंगी नियम आणि निकष बाजूला ठेऊन शेतकर्यांना मदत करण्याचा मानस त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतरही रविकांत तुपकरांनी कृषीमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्यांचे आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
१३ जून २०२३ रोजी कॅबिनेटच्या बैठकीत सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी १५०० कोटी रुपयांना मान्यता मिळाली, त्यात बुलढाणा जिल्ह्यासाठी अंदाजे २६० कोटी रुपये मिळणार आहेत. हा शेतकर्यांचा मोठा विजय आहे. पेरणी तोंडावर असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने नुकसान भरपाईचे पैसे शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे, जेणेकरून पेरणीसाठी हे पैसे शेतकर्यांना उपयोगात येतील अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.