जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार ७० कोटींची पीकविमा नुकसान भरपाई!
– लेखी पत्र नको, पैसे जमा करा – रविकांत तुपकरांचा इशारा
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्च्यात पीक नुकसानीपोटी जिल्ह्यातील पीकविमा उतरविलेल्या शेतकर्यांची तब्बल ७० कोटी रूपयांची नुकसान भरपाई प्रलंबित होती. या ५० हजार ७५७ शेतकर्यांची ही पीकविमा नुकसान भरपाई १५ जूनपर्यंत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल, असे लेखी पत्र भारतीय कृषी विमा कंपनीने (एआयसी) बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना त्यांचे नियोजित आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलेले आहे. तर लेखीपत्र नको, पैसे जमा करा, अन्यथा आंदोलनावर ठाम आहोत, असा इशारा तुपकर यांनी दिलेला आहे. दरम्यान, वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अशा प्रकारचे ‘लक्ष्यवेधी’ आंदोलने तुपकर करण्याची शक्यता पाहाता, त्यांना शक्य तो ‘हिरो’ होण्यापासून टाळण्यासाठी पीकविमा कंपनीवर सत्ताधारी पक्षाने दबाव वाढविलेला आहे. त्यामुळेच परवाच अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तातडीने पीकविमा कंपनीशी संपर्क साधून, हा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली होती.
लोकसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे ‘सुबोध सावजी स्टाईल’ आंदोलने नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता सत्ताधारी पक्षाने गृहीत धरली आहे. वास्तविक पाहाता, पंतप्रधान पीकविमा योजना काढलेल्या शेतकर्यांना खरीप हंगाम २०२२-२०२३ मध्ये पीक नुकसानीपोटी १५८.८७ लाख रूपयांची नुकसान भरपाई यापूर्वी ंrदेण्यात आली आहे. हे पैसे २ लाख २ हजार ४४० नुकसानग्रस्त शेतकर्यांपैकी एक लाख ९३ हजार ४३१ शेतकर्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तर नऊ हजार शेतकर्यांची पीकविमा नुकसानीची रक्कम ही एक हजार रूपयांपेक्षा कमी असल्याने ती देणे बाकी आहे. उर्वरित ५० हजार ७५७ शेतकर्यांची पीकनुकसानीपोटीची ७० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करणेबाबत व त्याबाबतचे दावे तपासणेबाबतचे काम कंपनी पातळीवर मागील आठवड्यातच पूर्ण झाले होते. ही रक्कम कंपनी लवकरच संबंधीत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणार होती. परंतु, तत्पूर्वीच रविकांत तुपकर यांनी मुंबईत पुन्हा एकदा लक्ष्यवेधी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर सरकार पातळीवरून पीकविमा कंपनीकडून माहिती घेण्यात आली व ही रक्कम तातडीने डीबीटीद्वारे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. बुलढाण्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना हा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवा, असे निर्देशही मुंबईतून देण्यात आल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले. त्यामुळे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीकविमा कंपनीशी तातडीने संपर्क केला. त्यानुसार, कंपनीने अधीक्षक कृषी अधिकारी यांना ई-मेल पाठवून १५ जूनपर्यंत ही रक्कम लाभार्थी शेतकर्यांच्या थेट खात्यावर जमा होईल, असे कळवले आहे. त्यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, रविकांत तुपकरांच्या आंदोलनासंदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संवाद साधताना सांगितले, की ”स्टंटबाज नेत्याला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे त्यांच्या स्टंटबाजीला ऊत येईल. पीकनुकसानीपोटी विमाधारक शेतकर्यांना नियमाप्रमाणे पीकविमा कंपनीने पैसे दिले नाहीत, काही दावे प्रलंबित आहेत, त्यावर कंपनी निर्णय घेत आहे. तसेच, याप्रश्नी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंभीर असून, त्यांनी पात्र शेतकर्यांना पीकविम्याची नुकसान भरपाई द्या, असे आदेश कंपनीला दिलेले आहेत. परंतु, मी कंपनीच्या विसाव्या मजल्यावरून उडी मारतो, जीव देतो, असे सांगून सनसनाटी निर्माण करण्याचे काम स्टंटबाज नेता करत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी स्टंटबाजी कामी येत नसते, प्रत्यक्ष लोकांचे कामे करावे लागतात”, असा टोलाही या नेत्याने आपले नाव छापू नका, असे सांगत तुपकरांच्या आंदोलनाला हाणला आहे.
————–