Head linesVidharbhaWARDHA

उपसा सिंचनच्या स्टोअरेज यार्डला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

वर्धा (प्रकाश कथले) – आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरपूर येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यातून उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचन योजना राबविण्याच्या कामाकरीता आणलेले ड्रीप, पाईप तसेच स्प्रिंक्लरचे साहित्य ठेवलेल्या स्टोअरेज यार्डला लागलेल्या भीषण आगीत स्टोअरेज यार्डमधील कोट्यवधीचे साहित्य खाक झाले. हे उपसा सिंचनचे काम जळगाव येथील जैन एरिगेशनला देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत जैन एरिगेशनच्यावतीने आर्वी तालुक्यातील शेतकर्‍यांना ड्रीप लावून देण्याचे काम करीत आहे. याद्वारे विनामूल्य सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्या कामाकरीताच धनोडीच्या हनुमान मंदिरासमोरील खुल्या सुमारे एक ते दीड एकर जागेवर हे स्टोअरेज यार्ड तयार करून तेथे ड्रीपसिंचनाचे साहित्य, पाईप साठवून ठेवले होते. दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास या साहित्याने अचानक पेट घेतला. आकाशात धुराचे लोट तसेच आगीच्या ज्वाळा दिसताच अग्निशमनदलाच्या पथकांना माहिती देत बोलावले गेले.

आगीची धग लांब अंतरावरही जाणवत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग विझविण्याकरीता पुलगाव, आर्वी येथून बोलावलेले अग्निशमनदलाची पथके घटनास्थऴी दाखल झाली असून आग विझविण्याचे काम वेगात सुरू असले तरी आग पसरतानाच दिसत आहे. या खुल्या जागेवरील स्टोअरेज यार्डमध्ये उपसा सिंचनच्या कामाकरीता कंत्राटदाराने आणलेले भरपूर साहित्य पडून आहे. आग पसरत असली तरी शक्य तेवढे साहित्य वाचविण्याचा प्रयत्न अग्निशमनदलाचे कर्मचारी करीत होते. पोलिस तसेच महसूलचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झालेले होते.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!