मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शहरानजीक असलेल्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २७४जवळ भरधाव असलेली कार उलटून झालेल्या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, सुदैवाने एअर बॅग उघडल्यामुळे चालकासह प्रवासी सुखरूप बचावले आहेत. तथापि, या प्रवाशांना गंभीर जखमा झालेल्या आहेत. हे प्रवासी कुसुंबा येथील असून, ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
सविस्तर असे, की अपघातग्रस्त कार नागपूरच्या दिशेने जात होती. कुसुंबा येथील कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह शाळेचे दोघे प्राचार्य आणि तीन कर्मचारी नागपूरला निघाले होते. त्याचवेळी मेहकरजवळ या कारला अपघात झाला. भरधाव असलेल्या या कारने अचानक चार वेळा पलट्या घेतल्या. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून, अपघातानंतर एअर बॅग उघडल्यामुळे चालक आणि एक जण सुखरुप वाचले. या अपघातामध्ये एकूण सहा जण जखमी झाले आहेत. कोणाच्या डोक्याला, नाकाला आणि हाताला दुखापत झाली आहे. तर एकाचा हात फॅक्चर झाला आहे. अपघातानंतर एका ट्रक चालकाने रुग्णवाहिका बोलावली त्यानंतर सर्वांना मेहकर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास मेहकर पोलिस करत आहेत.
—————