Breaking newsHead linesVidharbhaWARDHA

बनावट कपाशी बियाणेविक्रीचे राज्यातील सर्वात मोठे रॅकेट वर्ध्यांत उद्ध्वस्त!

– वर्धा पोलिसांच्या मध्यरात्रीच्या सुमारास नियोजनबद्ध कारवाई
– दीड कोटीचा मुद्देमाल जप्त, आठ आरोपी जेरबंद; राज्यभरातील लिंक उघड होणार!

वर्धा (प्रकाश कथले) – गुजरात राज्यातून कपाशीचे पोत्यांनी बियाणे आणत, ते वेगवेगळ्या नामांकित बियाणे उत्पादक कंपन्यांच्या पॉकेटमध्ये रिपॅकिंग करून त्याची विविध कृषी केंद्रात विक्री करण्याच्या गोरखधंद्याचे रॅकेट वर्धा पोलिसांनी रात्री दीड वाजताच्या दरम्यान केलेल्या नियोजनबद्ध कारवाईत उद्ध्वस्त केले. पोलिसांच्या या कारवाईने यापुढे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या बाहेरील लाखो शेतकरी खरीप हंगामात कपाशीच्या बियाण्याबाबत होणार्‍या फसवणुकीतून बचावले. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्त्वातील या देदिप्यमान शेतकरीहिताच्या कारवाईने वर्धा पोलिस यंत्रणेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. कपाशीच्या बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही राज्यातील पहिलीच मोठी कारवाई ठरत आहे. याचवेळी हे मोठे रॅकेट वर्ध्याच्या मुख्यालयी सुरू असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाला याची माहिती का मिळाली नाही, हाही चर्चेचा विषय ठरली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल २९७ पोत्यांत भरलेले कपाशीचे बनावट बियाणे, गुजरातचे रजिस्ट्रेशन असलेला एक आयशर कंपनीचा ट्रक तसेच विविध वाहनांसह तब्बल १ कोटी ५१ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हिरव्या थैलीतील तीन लाख ३०० रुपयांची रक्कमही जप्त केली असून, ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अद्यापही कारवाई सुरूच आहे. वर्धा शहरालगत जुना मसाळा परिसरात एका स्लॅबच्या इमारतीत हा कपाशीच्या बनावट बियाण्यांचा कोट्यवधींचा फसवणूक व्यवसाय ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीस सुरू झाला होता. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अकोला, वाशिम यासह राज्यभर येथे हे कपाशीचे बोगस बियाणे पाठविले जात होते. गुजरातेतून आणलेले हे कपाशीचे बियाणे नामवंत कंपन्यांच्या प्लास्टिक पॉकेटमध्ये पॅक करून ते कृषी सेवा केंद्राला विकले जात होते. या बियाण्यांचे पॉकेट तयार करण्याची मशीन या गोदामात होती. तेथे दोन अल्पवयीन मुलांसह आणखी तीन जणांकडून हे काम करून घेतले जात होते. या बोगस बियाण्यांच्या विक्रीचे कनेक्शन सेलू तालुक्यातील आरोपीसोबत जुळले आहे. जेवढे बोगस बियाणे पोलिसांना मिळाले, तेवढेच बियाणे विविध जिल्ह्यातील बाजारात विकले गेल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासात ही बाब स्पष्ट होणार आहे.

गुजरात राज्यातून आणलेल्या कपाशीच्या बियाण्याच्या पोत्यातील बियाणे विविध कंपन्यांच्या पॉकेटमध्ये रिपॅकिंग करीत ते नामवंत कंपन्यांच्या नावाने खुलेआम विकले जात होते.विविध कंपन्यांचे हे पॉकेट आरोपीने कोठे तयार करून घेतले, याची माहितीही पोलिस घेत आहेत. कापसाच्या बनावट बियाण्याची पेरणी केल्यानंतर किती शेतकरी उद्ध्वस्त झाले असते,ज्यांनी हे बियाणे खरेदी केले, त्यांचे किती नुकसान होणार, याची कल्पनाही करवत नाही. पण मिळालेल्या बियाण्याच्या साठ्यायेवढेच बियाणे या आरोपीने बाजारपेठेतील काही कृषी केंद्रांना विकले असल्याची माहितीही समोर येत आहे. घटनास्थळी मध्यरात्रीच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सेवाग्रामचे प्रभारी ठाणेदार धनाजी जळक़, तहसीलदार रमेश कोळपे, तालुका कृषी अधिकारी, उपनिरीक्षक शिवराज कदम, उपनिरीक्षक राहुल इटेकार, पोलिस कर्मचारी गजानन कठाणे, हरिदास काकड, अतुल वैद्य, संजय लाडे, अभय इंगळें, सचिन सोनटक्के, मारुती काटकर, आशीष डप यांनी हा छापा टाकला.


कृषी विभाग काय करत होता?

वर्धा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकांना या बोगस कापूस बियाण्यांच्या गैरप्रकाराची माहिती कां मिळाली नाही, हे अस्पष्ट आहे. या कपाशीच्या बोगस बियाण्यांचे पॉकेट मूळ कंपनीच्या कापूस बियाण्याच्या पॉकेट सारखेच दिसतात. यातील मुख्य आरोपीने त्याला कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांची जेवढी नावे माहित होती, तेवढ्या कंपन्यांच्या नावाने पॉकेट तयार करून घेतले होते. ज्या कृषी सेवा केंद्रांना त्याने बियाणे विकले, त्यावर तो घसघशीत कमीशन देत होता, अशी माहितीही समोर येत आहे. शेतकरी बियाण्याचे पॉकेट पाहून खरेदी करतो.त्याला आत बनावट बियाणे आहे किंवा काय, हे कळत नाही. याकरिता तो कृषी सेवा केंद्र चालकावर विश्वास ठेवतो. आता कपाशीचे किती बोगस बियाणे विकले गेले, ते कोणत्या कोणत्या कृषी केंद्राने खरेदी केले, याच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!