Head linesVidharbhaWARDHA

वर्ध्यातील भंगार गोदामाच्या आगीनंतर आर्वीतही भंगार दुकानाला आग

वर्धा (प्रकाश कथले) – आर्वी शहरातील इंदिराचौकातल्या एका भंगार दुकानासह तीन दुकानांना आग लागल्याने आगीत दुकानातल्या भंगार साहित्य़ाचा तसेच शेजारील दुकानातल्या साहित्याचा कोळसा झाला. यात दुकानमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वर्ध्यातील सेवाग्राम मार्गावरच्या एमआयडीसी परिसरातील दुकानांना एक दिवसाअगोदरच आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आर्वीतील ही दुसरी घटना असल्याने भंगार दुकान चालकांनी आता दुकानातील साहित्य सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

इंदिरा चौकातील आठवडी बाजारालगत श्री.जिरापुरे यांचे भंगार साहित्याचे दुकान आहे. रात्री २.२० वाजताच्या सुमारास या दुकानांना आग लागली. ही माहिती कळताच पालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार,सामाजिक कार्यकर्ते गौरव जाजू, वाहनचालक नरेश आखरे रात्री अडीच वाजता म्हणजेच माहिती कळल्यानंतर केवळ १० मिनिटात अग्निशमनदलाचे पथक घटनास्थऴी पोहोचले होते. त्यांनी लगेचच दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. पण आग वेगाने पसरत होती.ही परिस्थिती लक्षात येताच तसेच शेजारच्या दुकानांनाही आग कवेत घ्यायला लागल्याने गौरव जाजू आणि अरुण पंड्या यांनी पुलगाव तसेच आष्टी येथील अग्निशमनदलाच्या वाहनाला मदतीकरिता बोलावले. श्री.जिरापुरे यांच्या भंगार साहित्याच्या दुकानाच्या बाजूलाच आर्वी गुडस् गॅरेज आणि खानावळ आहे. येथेही आग पसरली होती. दुकानांना लागलेली आग तीन अग्निशमनदलाच्या वाहनासोबत आलेले कर्मचारी आगीवर पाण्याचा सतत मारा करून आटोक्यात आणण्याचे काम केले.

वाहनचालक नरेश आखरे, बबन बावणकर, नीलेश गिरडकर, अरुण पंड्या, फायरमन शिवाजी चिमोटे, यांच्यासह नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार, कनिष्ठ अभियंता साकेत राऊत, पाणीपुरवठा विभागातील अभियंता सुरेंद्र चोचमकर, सामाजिक कार्यकर्ते गौरव जाजू, आष्टीच्या अग्निशमनदल पथकातील नरेंद्र कदम तसेच त्यांचे सहकारी, पुलगावच्या अग्निशमनदल पथकाचे निखिल आटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास पुलगाव तसेच आष्टी येथील अग्निशमनदल पथकांची वाहने परत पाठविण्यात आली. आर्वी येथील अग्निशमनदलाचे वाहन कर्मचार्‍यांसह घटनास्थळी असून आग विझविण्याचे काम करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!