जेजुरी (विजय हरिश्चंद्रे) – संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत १६ जून रोजी मुक्कामी विसावत असून, त्या अनुषंगाने या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील काल तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज जेजुरीच्या पालखी तळाची पाहणी करून आधिकारीवर्गाशी चर्चा केली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत जेजुरी गडाच्या पायथ्याशी व ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर नऊ एकर जागेत गेल्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी नव्याने पालखी तळ विकसित करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि.८) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजुरीच्या पालखी तळाला भेट दिली. तर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जेजुरीत पालखी सोहळ्यासाठी जागा, पाणी, वीज, शौचालये, स्वच्छता, येणार्या वाहनांसाठी पार्किंग याबाबत चर्चा केली. जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी पालखी सोहळ्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी बाबाराजे जाधवराव भाजपा शहर अध्यक्ष, सचिन पेशवे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, गटनेते सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख उपस्थित होते. भाजपाचे सचिन पेशवे यांनी मंत्री विखे यांचा पालखी मैदानावर सत्कार केला. यावेळी नगरपालिका, पोलीस, आरोग्य, वीज, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.