वर्धा (प्रकाश कथले) – सेवानिवृत्त झालेल्या जलसंपदा विभागातील कर्मचार्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाची रक्कम काढून देण्यास १० हजारांची लाच स्वीकारताना जलसंपदा विभागातील वरिष्ठ लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली. लाच स्वीकारणार्या वरिष्ठ लिपिकाचे नाव जुगलकिशोर अलकनारायणजी बाजपेयी (वय ५१) असून, त्याने शांतिनगर मार्गावरील एकविरा अपार्टमेंटमधील घरीच ही लाचेची रक्कम स्वीकारली.
जलसंपदा विभागात मजूर पदावर कार्यरत पवनार येथील रहिवासी असलेले कर्मचारी जानेवारी २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मिळत असलेल्या निवृत्तिवेतनातील फरक काढून तसेच सेवापुुस्तिकेतील त्रुट्या दूर करण्याकरीता शिवाय मू़ळ वेतनामधील फरक काढून देयक मंजुरीकरीता पाठविण्यास वरिष्ठ लिपिक जुगलकिशोर बाजपेयी याने २० हजारांची लाच मागितली होती. ती रक्कम कमी करायलाही वरिष्ठ लिपिक बाजपेयी तयार नव्हता. अखेर पहिल्यांदा १० हजार रुपये तसेच लाभाची रक्कम मिळाल्यावर १० हजार रुपये देण्याची तडजोड झाली. पण लाचेची रक्कम द्यायची सेवानिवृत्त कर्मचार्याची इच्छा नसल्याने त्यांनी येथील भ्रष्टाचार व लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांसोबत संपर्क साधला.
येथील भ्रष्टाचार व लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताऴणी केली. त्यात वरिष्ठ लिपिक जुगलकिशोर बाजपेयी याने त्याच्या राहत्या घरीच सेवानिवृत्त मजुराकडून ही लाचेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आज दुपारी १ वाजता त्याने शांतिनगर मार्गावरील एकविरा अपार्टमेंटमध्ये ही लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच भ्रष्टाचार व लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच त्याच्याजवळून त्याने स्वीकारलेली लाचेची रक्कम जप्त केली. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माणकीकर, वाचक पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, उपअधीक्षक अभय आष्टेकर, यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार रवींद्र बावणेर, हवालदार संतोष बावणकुळे, शिपाई विनोद धोंगडे, प्रदीप कुचनकर, प्रशांत मानमोडे, स्मिता भगत यांनी केली.