सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. परंतु नेमके अचानक काय झाले कुणास ठाऊक, दोन्हीही पत्रकार परिषदा अचानक रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे भाजपचे खासदार, आमदार हे मुहूर्त पाहूनच माध्यमांशी बोलणार आहेत का? असा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध योजनांची माहिती देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांची पत्रकार परिषद शनिवार, ३ जून रोजी दुपारी १२ वाजता आमदार देशमुख यांच्या संपर्क कार्यालय राजवाडे चौक नवी पेठ येथे होणार होती. तर सोलापूरचे खासदार डॉ. महास्वामी यांची पत्रकार परिषद सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे रविवारी चार वाजता आयोजित करण्यात आली होती. परंतु अचानक ही पत्रकार परिषददेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे माध्यमाच्या प्रतिनिधी यांना सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या खासदार, आमदार यांच्यामध्ये समन्वय नाही का? अशी चर्चा माध्यमांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे, खासदार यांनी तर चक्क रविवारी माध्यम प्रतिनिधी कमी असतात म्हणून पत्रकार परिषदेचे तर आयोजन केले नव्हते ना, अशी चर्चा होती. कारण माध्यम प्रतिनिधी नको ते प्रश्न विचारतील आणि आपल्याला बोलण्यास अडचणी होतील, अशी चर्चा माध्यमामध्ये होते. दरम्यान, खासदार महास्वामी यांची रद्द झालेले पत्रकार परिषद सोमवारी ५ जून १२ वाजता घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.