ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांचे वयाच्या ९४व्यावर्षी निधन
– उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजीपार्क येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार
मुंबई (प्राची कुलकर्णी) – हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री, ‘पद्मश्री’ तसेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित सुलोचना (दिदी) लाटकर यांचे आज (दि.४) सायंकाळी सहा वाजता श्वसनाच्या दीर्घ आजाराने मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रूग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव उद्या (दि.५) प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजीपार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुलोचनादिदींच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींनी दिदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रूपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेली सोज्वळ, प्रेमळ आई आजही अनेकांच्या स्मरणात आहे. हिंदीमध्ये त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या आईची बहुतांश चित्रपटांत भूमिका साकरली होती.
दिदींनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून कसदार भूमिका साकारलेल्या आहेत. ‘मराठी तितुका मेळवावा’ या चित्रपटातून त्यांनी जिजाऊ मॉसाहेबांची भूमिका केली होती, जी प्रचंड गाजली होती. दिदी या प्रसिद्ध अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या सासू होत्या. काशिनाथ घाणेकर यांची दुसरी पत्नी कांचन घाणेकर यांच्या सुलोचना आई होत्या. कांचन यांनीच दिदींच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. त्यांना ९ मेच्या रात्री सुश्रुषा रूग्णालयात श्वसनाच्या त्रासामुळे दाखल करण्यात आले होते. तसेच, काल रात्रीपासून कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. दीदी यांची मार्च महिन्यात तब्येत खराब झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचनादीदी यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले होते. इतकेच नाही तर तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन लाख रुपयेही देण्यात आले होते.
सुलोचनादिदींचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. १९४३ यावर्षी त्यांनी अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना प्रसिद्ध निर्माते, दिग्ददर्शक भालजी पेंढारकर (बाबा) यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या तालमीत सुलोचनादिदी तयार झाल्या होत्या. दिदींनी आपल्या सोज्वळ दिसण्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांची प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. दिदींचे अनेक चित्रपट खूपच गाजले. त्यात १९५३-५४ मध्ये आलेले ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे प्रेक्षकांना भावले होते. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले आहेत.
मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही दिदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी चित्रपटसृष्टीतील मौलिक योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९६३), संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार (१९६८), महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ (१९९७), केंद्र शासनातर्पेâ ‘पद्मश्री’ (१९९९), अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्पेâ ‘चित्रभूषण’ पुरस्कार (२००३), महाराष्ट्र शासनातर्पेâ ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (२०१०) पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
———————-