Breaking newsBULDHANAChikhaliHead linesMEHAKARVidharbha

समृद्धी महामार्गाने घेतले आणखी पाच बळी!

– तीन विविध अपघातात एकूण चौघेजण गंभीर जखमी

चिखली/मेरा बुद्रूक (कैलास आंधळे/सुनील मोरे) – समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण पाच जणांचा बळी गेला आहे, तर चौघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघातात देऊळगावराजा तालुक्यातील दिग्रस बुद्रूक येथील मांटे कुटुंबातील वडिल, मुलगा व पुतण्या ठार झाल्याने दिग्रस गावावर शोककळा पसरली आहे. मेहकरजवळ फर्दापूर टोलनाक्यानजीक लघुशंकेसाठी वाहन थांबविणे या तिघांच्या मृत्यूस कारण ठरले असून, भरधाव आलेल्या सिमेंट मिक्सरच्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना मेहकरजवळ मांटे कुटुंबीय लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी भरधाव वेगात येणार्‍या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये विजय शेषराव मांटे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला तर ओम विजय मांटे (वय १९), तुषार गजानन मांटे (वय ३२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मांटे कुटुंबीय हे आपल्या वाहनाने वाशिमहून बीडकडे निघाले होते. त्यांच्या मृत्यूने दिग्रस बुद्रूक गावात शोककळा पसरली होती. यातील तुषार मांटे हे शासकीय कंत्राटदार हाेते, वाशिम येथील लग्न आटाेपून ते परत येत होते. तर ओम मांटे याचा आज एमपीएससीचा पेपर होता. या घटनेने दिग्रस गावासह परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

याच महामार्गावरील दुसरा अपघात हा मेहकरजवळ झाला. भरधाव असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अचानक उलटली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे जखमी झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाग्रस्त हे धुळ्याहून नागपूरच्या दिशेने जात होते. तर तिसर्‍या अपघातात भरधाव जाणार्‍या ट्रकचालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आत ट्रक बेरिअर महामार्गाच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रकचालक दिनेशकुमार तिवारी (रा. आझमगड) जागीच ठार झाला. या समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत, या तीन अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.


दिग्रस बुद्रूक येथे अंत्यविधी

या दुर्देवी अपघातात मृत्युमुखी पडलेले तुषार मांटे हे शासकीय कंत्राटदार होते. मेहकर-वाशिमरोडवरील अपघातात त्यांच्यासह त्याचे काका व चुलतभाऊदेखील मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम दुपारी देऊळगावराजा तालुक्यातील दिग्रस बुद्रूक येथे पार पडला. दिग्रस बुद्रूक हे गाव देऊळगावमहीपासून पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावर आहे. या अपघातातील तुषार मांटे यांचा चुलतभाऊ ओम याचा आज, रविवारी एमपीएससीचा पेपर होता. त्यामुळे त्यांच्या काकू या लग्नाच्या वर्‍हाडासोबत त्याचा डबा तयार करण्यासाठी पुढे गेल्या होत्या. तर ओम हा वडिल व तुषार यांच्यासोबत मागून येत होता. सकाळीच तो पेपर देण्यासाठी जाणार होता, परंतु त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. हे तिघे वाशिम येथील लग्न आटोपून समृद्धी महामार्गाने परत येत होते. फर्दापूर टोल नाक्यानजीक ते लघुशंकेला थांबले आणि तिथेच त्यांचा घात झाला. लघुशंका आटोपून ते गाडीत बसत असताना भरधाव असलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडवले. पहाटे चार वाजेच्या सुमारास हा दुर्देवी अपघात घडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!