सांगली हादरले! रिलायन्स ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, गोळीबार; कर्मचारी बांधून ठेवले, कोट्यवधींच्या सोन्याची लूट!
सांगली (संकेतराज बने) – सांगली-मिरज रस्त्यावरील मार्वेâट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर पाच ते सहा दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकत कोट्यवधीचे सोने-चांदी लुटून नेले. दरोडेखोरांनी गोळीबारही केला. शोरूममधील कर्मचार्यांना बांधून ठेवले. सिनेस्टाईलने दरोडेखोरांनी सोने-चांदीचे दुकान लुटल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी लावून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर ग्राहक म्हणून शोरूममध्ये शिरले. त्यांनी तोंडाला मास्क लावला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवित कर्मचार्यांना बांधून घातले. यात महिला कर्मचार्यांचाही समावेश होता. काही ग्राहकांनाही दरोडेखोरांनी धमकी दिली. ज्वेल्सच्या व्यवस्थापकाला मारहाणही केल्याचे समजते. त्यानंतर दुकानाच्या शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने सोबत आणलेल्या बॅगेत भरले. एका ग्राहकाने दरोडेखोराशी वाद घातला. यानंतर थेट फायरिंग करत दहशत माजवली. घटनास्थळी एक काडतूस पडलेले होते. तर शोरूमच्या काचाही फुटल्या होत्या. सोने-चांदीची लुट करून दरोडेखोर सफारी गाडीतून पसार झाले.
या दरोडेखोरांनी शोरूमधील सीसीटीव्हीचा डीसीआरही सोबत नेला. तब्बल तासभर शोरूममध्ये चोरीचा प्रकार सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली. परंतु पोलीस मुख्यालयापासून केवळ तीनशे मीटर अंतरावर असणार्या रिलायन्स ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या दरोडा पडतोय ही चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. पोलिसांच्या कामगिरी वरती प्रश्नचिन्ह उभा करत जनता मात्र दहशतीखाली असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.