काहीच नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन, महादेव जानकर मेंढ्या वळतील!
– मी भाजपची, भाजप थोडाच माझा आहे – पंकजांच्या सूचक वक्तव्यानंतर राजकारण पेटले!
– किती दिवस रडत बसायचं? धाडसाने निर्णय घ्या – खा. संजय राऊत यांचा पंकजांना सल्ला
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – मला कशाचीच भीती वाटत नाही, घाबरणं हे आमच्या रक्तातच नाही, कशाचीच चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन, माझा भाऊ महादेव जानकर मेंढ्या वळायला जाईल. मी भाजपची आहे, पण भाजप थोडाच माझा आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या व्यासपीठावरून भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्रातील राजकारण पेटले असून, पंकजा मुंडे यांनी रडत बसल्यापेक्षा आता परिणामांची चिंता न करता निर्णय घ्यावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा, असा सल्ला शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अनिल देशमुख यांनी पंकजा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचे संकेत दिलेत.
दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे – पालवे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षावरील नाराजी उघडपणे बोलून दाखवली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी म्हटले की, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळाले तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे? भाजप खूप मोठा पक्ष आहे, मी फक्त त्यामध्ये काम करते. गोपीनाथ मुंडे यांनी मोठे काम केले. मुंडे साहेबांनी अनेक आमदार, खासदार बनवले. यामुळे आता सरकार स्थापन करण्यापर्यंत प्रवास केला. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी कधीही कुणासमोर झुकणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
खा. प्रीतम मुंडेंचाही केंद्र सरकारला घरचा आहेर!
देशभर गाजत असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी भूमिका भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्यावतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. दरम्यान, अभियानाची माहिती देण्यासाठी बुधवारी संघर्षयोद्धा भाजप जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार मुंडे म्हणाल्या, केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणून मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. लोकशाहीत ही घटना स्वागतार्ह नसल्याचे त्या म्हणाल्या, आणि आपल्याच भाजप सरकारला घरचा आहेर दिला होता.
संजय राऊत यांच्या मुंडे भगिनींना कानपिचक्या!
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, मुंडे भगिनींबाबत भाजपच्या भूमिकेवरून भाजपसह मुंडेभगिनींनादेखील जोरदार कानपिचक्या दिल्यात. खा. राऊत म्हणाले, की पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत, पण त्यांना भाजप आपले मानत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप उभा करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. त्या मुंडे परिवाराचे अस्तित्त्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरु आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे राजकारणात असणार्या मुंडे परिवाराच्या प्रमुख लोकांनी साहसाने निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकारणात हिंमतीने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेतले तरच राजकारणात टिकता येते. माझ्यावर अन्याय होतोय, अशा नेहमीच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही, असे संजय राऊत म्हणालेत. पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव का व कसा झाला?, हे सांगण्याची आता गरज नाही. भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
—————–